नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
अॅग्रो विशेष
सिद्धरामेश्वर यात्रेत भाकणूक : यंदा पाऊसमान राहणार चांगला
ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडास, मूर्तीस करमुटगी स्नान घालून हळद काढण्याचा विधी गुरुवारी (ता.१४) झाला.
सोलापूर ः ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडास, मूर्तीस करमुटगी स्नान घालून हळद काढण्याचा विधी गुरुवारी (ता.१४) झाला. तसेच रात्री होमप्रदीपनासह भाकणूकही झाली. यंदा पाऊसमान चांगलं राहणार असल्याची भाकणूक या वेळी करण्यात आली.
कसब्यातील हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या दोन्ही नंदिध्वजांचे मानकरी देशमुख, हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर सजवलेल्या बग्गीतून हिरेहब्बू योगदंड घेऊन मंदिराकडे निघाले. दत्त चौक, माणिक चौक, विजापूर वेसमार्गे बग्गी, पालखीरथ मंदिर परिसरातील संमती कट्टा येथे आला. सुरुवातीला श्रींची मूर्ती व योगदंडास करीमुटगी लावून तलावात स्नान घालण्यात आले. सकाळी हळद काढल्यानंतर ६८ लिंगांपैकी मंदिर परिसरातील पहिल्या अमृतलिंगाची विधिवत पूजा झाली.
अशी झाली भाकणूक
सिद्धरामेश्वर यात्रेतील भाकणुकीलाही विशेष महत्त्व असते, यासाठी दिवसभर गाईच्या वासराला उपाशी ठेवले जाते. रात्री त्याच्यासमोर विविध वस्तू ठेवून भाकणूक केली जाते. वासराच्या खाण्यापिण्यावरून ही भाकणूक होते. यामध्ये वासरासमोर गूळ, खोबरे, कडधान्य, कडबा, गाजर आणि पाणी, विडा ठेवला. आरतीनंतर वासराला टेंभा दाखविला. दिवसभर उपाशी वासरू अस्वस्थपणे समोर दिसलेल्या प्रत्येक वस्तूला स्पर्श करीत राहिले. त्या आधारावर २०२१ वर्ष हे काहीसे अस्थिर मानसिकतेचे असेल. काही वस्तूंची टंचाई जाणवेल, पण पाऊस चांगला असेल, अशी भाकणूक या वेळी शिवानंद हिरेहब्बू यांनी केली.