राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता

हवामान अंदाज
हवामान अंदाज

पुणे : अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनच्या पावसाने विदर्भ, कोकणात दमदार  हजेरी लावली आहे. कोकणसह विदर्भात पावसाची मुसळधार कायम असल्याने नद्यांनी पात्र सोडले आहे. घाटमाथ्यावरील पावसाने कोल्हापूर, सांगलीत पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोल्हापूरमधील गगनबावडा येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागल्याने पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. आज (ता. ९) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे; तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबई शहरातदेखील मध्यरात्रीपासून पाऊस पडत असून, आज सकाळी मुंबईतील सखल भाग असलेल्या सायन, दादर आणि हिंदमाता परिसरात पावसाचे पाणी साचले. पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, मोखाडा आणि तलासरी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पालघरमधील कवडास धरण आणि धामणी धरण ओव्हरफ्लो झाले. सूर्या नदीही दुथडी भरून वाहू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक नद्या पूररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. तिलारी नदी धोक्याच्या पातळीनजीक पोचली आहे. तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील मांडकुली (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यावर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.  कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कायम असल्याने धरणांतून होणारा विसर्ग कायम राहिला. रविवारी (ता. ८) दुपारपर्यंत नद्यांचे पाणी आजूबाजूच्या शिवारात पसरू लागले होते. सातत्याने वाढत्या विसर्गामुळे पाणी नागरी वस्तीत शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याने काही कुटुंबांनी स्थलांतरही सुरू केले. दुपारी बारा वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी ३८.७ फूट होती. जिल्ह्यातील ६७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीमुळे ४ राज्यमार्ग व १८ प्रमुख जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंद झाली. हातकणंगले तालुक्‍यातील पन्हाळा, वाघबीळ, इचलकरंजी, शिरदवाड राज्य मार्ग क्र. १९२ या मार्गांवरील इचलकरंजी येथे पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून, पूल जुना असल्याने खबरदारीसाठी वाहतूक बंद केली आहे. शिरोळ तालुक्‍यातील अतिग्रे, शिरढोण, मजरेवाडी, इचलकरंजी, टाकळी, खिद्रापूरपर्यंतच्या मार्गावर शिरढोण पुलावर ५ फूट पाणी तसेच मजरेवाडी ते अकिवाट गावाजवळ पाणी असल्याने वाहतूक बंद केली. गडचिरोलीतील पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती, प्राणहिता, वैनगंगा या नद्यांना पूर आल्याने भामरागडला मोठा फटका बसला आहे. सत्तर टक्के गाव पाण्याखाली आले आहे. सहाशेवर गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे २० प्रमुख मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने सुमारे ३०० गावांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटलेला आहे. तर, या पुरात जिल्ह्यातील तीन जण वाहून गेले आहेत. भामरागड-आलापल्ली या ६५ किमीच्या मार्गावरील सर्व पूल पाण्याखाली गेल्याने तालुक्यांमधील १२५ गावांचा संपर्क तुटला आहे. पाल नदीला पूर आल्याने दिवसभर गडचिरोलीचा नागपूरशी संपर्क तुटला होता. गोसे खुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पूर आला आहे. आष्टीलगतचा पूल पाण्याखाली गेल्याने अहेरी, एटापल्ली, भामरागड, मूलचेरा, सिरोंचा या पाच तालुक्यांचा चंद्रपूरशी; तर आलापल्ली-आष्टीदरम्यान चौडमपल्ली नाल्याला पूर आल्याने हा मार्ग बंद होता. शिवणीजवळच्या पुलावर सायंकाळी पाणी आल्याने पाच तालुक्यांचा गडचिरोलीशी संपर्क तुटला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : सांताक्रुझ ११९, डहाणू १४६, जव्हार ७०, पालघर २१०, तलासरी १०४, वसई १०२, विक्रमगड १२६, अलिबाग १२७, भिरा ८९, कर्जत ८४, खालापूर ७२, माणगाव ११०, माथेरान १२८, म्हसळा ६७, मुरूड १०४, पनवेल ८६, पेण १४५, पोलादपूर १०७, रोहा १२७, श्रीवर्धन ८६, सुधागडपाली १०६, तळा ११९, उरण १११, चिपळूण १८४, खेड ७८, मंडणगड १२५, राजापूर १२६, रत्नागिरी ७८, संगमेश्वर ९८, देवगड ११०, दोडामार्ग १६०, कणकवली १६३, कुडाळ ६५, मालवण ५६, सावंतवाडी १०५, वैभववाडी १५७, वेंगुर्ला १५९, अंबरनाथ ५८, भिवंडी १६०, कल्याण १०९, शहापूर १००, ठाणे १४५, उल्हासनगर ७८. मध्य महाराष्ट्र : शिरपूर ६०, आजरा ४६, चंदगड ८१, गडहिंग्लज ५५, गगणबावडा २४५, कागल ४६, पन्हाळा ५७, राधानगरी ११३, शाहूवाडी ४८, शिरोळ २२, इगतपुरी ५९, ओझरखेडा ५४, पौड ४८, वेल्हे ४४, महाबळेश्वर १४७, पाटण ५८. मराठवाडा : माहूर २६.  विदर्भ : लाखणी ३०, आहेरी ३२, धानोरा ४०, एटापल्ली ४९, मुलचेरा ६७, आमगाव १२२, गोंदिया २०८, गोरेगाव ३७, सालकेसा ९२, तिरोडा ३१, पारशिवणी ३०.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com