वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी 

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा कोकण, मध्य महाराष्ट्राला तडाखा बसला असून, मराठवाडा विदर्भातही पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वारे आणि पावसामुळे शेतपिके, मालमत्तेची मोठी झाली आहे.
cyclone
cyclone

पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा कोकण, मध्य महाराष्ट्राला तडाखा बसला असून, मराठवाडा विदर्भातही पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वारे आणि पावसामुळे शेतपिके, मालमत्तेची मोठी झाली आहे. वादळामुळे भाजीपाल्यासह उभ्या पिकांना फटका बसला असून, द्राक्ष, डाळिंब, केळी, ऊस पपईसह फळबाग झोपल्या आहे. जोरदार वाऱ्यामुळे, पोल्ट्री, पॉलीहाऊस, शाळा, अंगणवाड्या, घराचे पत्रे आणि छपरे उडून गेली आहेत. वादळाचा प्रभाव ओसरेपर्यंत आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.  नगर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३) पाऊस झाला. सकाळी आठ वाजेपर्यंत सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. जिल्हयात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. नगर, राहुरी, अकोले, कर्जत, पारनेर, पाथर्डी भागात, रात्री आठनंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गावतलाव, पाझर तलावासह बंधाऱ्यांत पाणी साठले. निसर्ग चक्रीवादळाचाही काहीसा परिणाम जिल्ह्यात दिसून आला. बुधवारी दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढला. पावसाची रिमझिम दिवसभर सुरु होती. या पावसामुळे काही प्रमाणात फळे, भाजीपाल्याला फटका बसला.  सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी (ता.२) रात्री पूर्वमोसमी पावसाने पुन्हा हजेरी लावली. पण, पावसापेक्षाही अधिक वादळ वारेच वाहिले. बुधवारीही (ता.३) दिवसभर पुन्हा अशीच स्थिती राहिली. काही भागात हलकासा शिडकावा झाला, पण वादळ वारेच अधिक राहिले. मोहोळ, पंढरपूर, माढा, करमाळा, मंगळवेढ्याच्या भागात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी नऊ आणि त्यानंतर दुपारी साडेअकराच्या सुमारास अनेक भागात हलका पाऊस झाला. पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात वादळाचा सर्वाधिक प्रभाव जाणवला. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पोल्ट्रीशेड, कांदाचाळ, पॉलीहाऊस, द्राक्षबागा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. मावळ, आंबेगाव, खेड, जुन्नर, वेल्हे, मुळशी तालुक्यात सर्वाधिक फटका बसला. दुपारी दोन वाजल्यानंतर वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढला जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. जोरदार वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी अंगणवाडी, शाळा, घरांचे छत उडून गेली. झाडपडीच्या घटना मोठ्या प्रमाणावर झाल्या.  नाशिक जिल्ह्यात बुधवार(ता.३) सकाळपासून सर्वदूर ढगाळ वातावरणासह होते. नाशिक शहरासह सिन्नर, निफाड, चांदवड भागातही हलक्या सरी बरसल्या. मात्र जिल्ह्याच्या पूर्व भागात येवला तालुक्यात परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. देवळा, सटाणा तालुक्यात मध्यम हलक्या सरी बरसल्या. त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी या भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने वादळाचा तडाख्यात पोल्ट्री शेडचे नुकसान झाले. यात दोन हजार पक्षी मृत झाले आहेत.मात्र कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तरही ठिकाणी घर, कांदा चाळ, जनावरे व पोल्ट्री शेडचे पत्रे उडाले. तर अनेक झाडे या भागात उन्मळून पडली.  नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात हलका ते जोरदार पाऊस झाला. दमदार पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांनी वेग येणार आहे. नांदेड, हिमयातनगर, भोकर, हदगाव नायगाव, देगलूर, मुखेड, कंधार तालुक्यातील अनेक मंडळांत जोरदार पाऊस झाला. परभणीसह मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा, सेलू तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर होता. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत तालुक्यातील काही मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला.  वऱ्हाडात पावसाची हजेरी  वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सोबतच पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. अनेकांनी बुधवारी (ता. ३) सकाळीच मॉन्सूनपुर्व कपाशी लागवड, हळद बियाणे रोवणीचे काम सुरु केले.  सिंधुदुर्ग जिल्ह्याला दणका  सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. वाऱ्यांमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मालवण, देवगड येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. जिल्ह्यात ७१ मि.मी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी, रायगडमध्येही जोरदार वारे आणि पाऊस पडत आहे. वादळीवारा आणि मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना घडल्या. विद्यूत वाहिन्या, खांब पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला.  वादळाचा फटका 

  • जोरदार वाऱ्यासह, पावसाची हजेरी
  • शेतपिके, मालमत्तेची मोठी हानी 
  • उभ्या पिकांना फटका, फळबागा झोपल्या
  • झाडे उन्मळून पडली, घरांचीही पडझड 
  • पोल्ट्री शेड, कांदा चाळ, पॉलीहाऊसचे नुकसान 
  • विद्युत वहिन्या खांब तुटल्याने वीज पुरवठा खंडीत   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com