मध्य भारतासह उत्तर भारतात पाऊस

हिमाचल, गुजरात, राजस्थान, बिहारमध्ये पाऊस
हिमाचल, गुजरात, राजस्थान, बिहारमध्ये पाऊस

नवी दिल्ली : देशात शनिवार-रविवारी राजस्थान, गुजरात, हिमाचल, काश्‍मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारच्या बहुतांश भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. राजधानी दिल्लीत तुरळक पाऊस पडला. बिहारमध्ये रेल्वेसेवा विस्कळित असून, उत्तर प्रदेशमध्ये शरयू नदीला पूर आल्याने बोट उलटून चौघे बुडाले. दरम्यान, दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक राज्यांत पावसाचा अंदाज पाहता अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत कर्नाटक, केरळ, उत्तर भारतातील काही राज्यांसह मुसळधार पावसाची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे. पूर्व भागात सामान्य ते मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

कोटा येथे विक्रमी पाऊस जयपूर : राजस्थानच्या कोटा आणि अन्य ठिकाणी शनिवार रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोटा येथे पावसाने अडकलेल्या शंभर नागरिकांना एसडीआरएफच्या पथकाने सुरक्षित ठिकाणी हलविले. कोटात आज सकाळपर्यंत १५१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सवाईमाधोपूर येथे विक्रमी ६८ मिलिमीटर पाऊस पडला. राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.

अमरनाथ यात्रा पावसाने स्थगित जम्मू/श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. तिन्ही ठिकाणच्या शिबिरात भाविकांना थांबण्याचे निर्देश दिले आहेत. अमरनाथ गुहेजवळ हिमवृष्टी होण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे. वातावरण सामान्य झाल्यानंतरच यात्रा बहाल केली जाईल, असे सांगण्यात आले. अमरनाथ गुहेजवळ असणाऱ्या एक हजार भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात आली. त्यामुळे रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ९९० भाविकांनी अमरनाथचे दर्शन घेतले. आतापर्यंत ३ लाख १८ हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे. ४६ दिवस चालणाऱ्या यात्रेची १५ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमेला सांगता होईल.

हिमाचलमध्ये पावसाने हाहाकार शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. पावसामुळे राज्यातील तीन राष्ट्रीय महामार्गांसह ११३ मार्ग बंद करण्यात आले आहेत. हजारो पर्यटक वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. शनिवारी शिमल्यासह अनेक भागांत पाऊस झाला. त्याच वेळी सोलंगनानंतर गोशाल येथेही तात्पुरता पूल वाहून गेला. व्यास नदीला आलेल्या पुरामुळे सोलंगनाला येथील पूल वाहून गेला. ठिकठिकाणी दरड कोसळणे, भूस्खलन होत असल्याने वाहतूक विस्कळित होत आहे. चंडीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावरील मंडीजवळ दरड कोसळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

शरयू नदीत नाव उलटून चौघे बुडाले लखनौ : मुसळधार पावसामुळे शरयू नदीला पूर आला असून, शरयू नदीत बोट उलटून चौघे बुडाल्याची घटना बहराईचजवळ लोकाही येथे घडली. या बोटीत वीस ग्रामस्थ होते. ते भादापुरवा येथे शेतीकामासाठी जात होते. यात चौघांचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, आतापर्यंत दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. घटनास्थळी एनडीआरएफचे पथक कार्यरत असून, उर्वरित ग्रामस्थांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. पावसामुळे नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. बोटीला एक मोठा लाकडी ओंडका आदळल्याने बोटीचे संतुलन बिघडले आणि ती उलटली. तसेच बांदा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बिसंडा पोलिस ठाण्यातंर्गत अलिहा भिंत पडल्याने सातवर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

बिहारमध्ये रेल्वेसेवा विस्कळित हाजीपूर (बिहार) : मुसळधार पावसामुळे पूर्व-मध्य रेल्वे विभागाच्या अनेक गाड्या रद्द किंवा वळविण्यात आल्या आहेत. बिहारमधील पुराने दरभंगा-समस्तीपूर रेल्वे रद्द केली आहेत. हयाघाट विभागात पूल क्रमांक १६ येथे पाण्याने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने समस्तीपूर रेल्वे रद्द केली. याशिवाय चार पॅसेंजर रेल्वेगाड्या रद्द केल्या असून, त्यात जयनगर पाटणा इंटरसिटीचा समावेश आहे. दरभंगा नवी दिल्ली संपर्कक्रांती, राक्‍सल हैदराबाद एक्‍स्प्रेस, अहमदाबाद दरभंगा जनसाधारण एक्‍स्प्रेस, जयानगर अमृतसर एक्‍स्प्रेस, कोलकता सीतामर्ही एक्‍स्प्रेस या गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com