पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. गत तीन ते चार दिवसांत जिल्ह्यातील पश्चिम भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आत्तापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणे तुडुंब भरली असून अनेक धरणांतून विसर्ग सुरू आहे. पूर्व भागात हवामान ढगाळ तर अधूनमधून ऊस सावल्यांचा खेळ सुरू असून या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात जवळपास वीस जूनपासून पावसाला सुरवात झाली. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक जूनपासून सर्वाधिक ३९१३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वडिवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३५५५, मुळशी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात ३४३०, पवना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात ३०५२ मिलिमीटर पाऊस झाला.

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहत असून धरणांतील पाणीपातळी झपाट्याने वाढली.  कळमोडी, वडिवळे, आंद्रा, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तसेच पवना, घोड, कासारसाई, येडगाव, वडज, डिंभे, गुंजवणी, निरा देवधर, भाटघर, वीर, नाझरे ही धरणे ९० टक्क्यांहून अधिक भरली आहेत.  

सोमवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी व टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ५४ मिलिमीटर पाऊस पडला. निरा देवधरच्या पाणलोट क्षेत्रात ५२ मिलिमीटर पाऊस झाला. वडिवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३८, पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३२, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २२, गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २१, कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १५, कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४, आंद्रा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १३, भामा आसखेडच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९, डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७, पिंपळगाव जोगे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६, चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५, खडकवासला, भाटघर, नाझरे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चार, माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन मिलिमीटर पाऊस झाला. 

घोड, विसापूर, वडज, येडगाव या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली. पूर्व भागातील शिरूर, इंदापूर, दौड, बारामती, पुरंदर या तालुक्यांतही पावसाने उघडीप दिली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com