अतिवृष्टी अनुदानाचा धुळे जिल्ह्यात घोळ

अतिवृष्टी अनुदानाचा धुळे जिल्ह्यात घोळ
अतिवृष्टी अनुदानाचा धुळे जिल्ह्यात घोळ

देऊर,  जि. धुळे  : धुळे तालुक्‍यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टिग्रस्तांच्या अनुदानाचा घोळ सुरूच आहे. जिल्हास्तरावर अनुदान येऊनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी धुळे तहसील कार्यालयात रोज खेटे घालत आहेत. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे.   जिल्ह्यात ऑक्‍टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये क्‍यार व महाचक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अवेळी पावसामुळे तालुक्‍यातील पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना मदत व सवलत शासनाने दिली आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यांत ६३ कोटी ७१ लाख, ८० हजार, पाचशे रुपये मंजूर अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान तहसील कार्यालयाने बॅंकेत वर्ग केले. बॅंकेने ‘डीडीसी’सह इतर बॅंकांकडे निधी वर्ग केला. मात्र हे अनुदान तालुक्‍यात बोटांवर मोजण्याइतकेच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. त्यामुळे गावागावात बहुतांश शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.  शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याला तांत्रिक अडचणीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे अद्याप तब्बल तीन कोटी रुपये संबंधित बॅंकेत अधांतरी पडले आहेत. त्यात बॅंक चुकीचे खाते क्रमांक, चुकीचे आधार क्रमांक, शेतकरी मृत, इतर हक्क आदी दिशाभूल करणारी कारणे आहेत. हे तीन कोटी व उर्वरित तिसरा टप्प्यातील येणारे अनुदान तत्काळ खात्यावर वर्ग करून तिढा सोडवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्‍यांच्या तहसीलदारांना २१ नोव्हेंबर, १७ डिसेंबरला अनुदानाचे पत्र दिले आहे. गावस्तरावर शेतकऱ्यांकडून माहिती घेताना तलाठींनी काळजी घेणे अपेक्षित होते. मात्र बहुतांश शेतकऱ्यांचे चुकीचे आधार क्रमांक एक्‍सल शीटला नोंद केले आहे. तेच एक्‍सेल शीट पुढे तालुक्‍याला पाठवले. धुळे तहसील कार्यालयाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देणे आवश्‍यक आहे. शेतीपिकासाठी नुकसानभरपाई प्रति हेक्‍टरी आठ हजार रुपये, बहुवार्षिकला (फळबागा) अठरा हजार रुपये मदत आहे. स्थानिकस्तरावर अनुदान वर्ग जमा झालेल्या बॅंकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com