पावसाचा मराठवाड्यात ४१ लाख हेक्‍टर क्षेत्राला फटका

पावसाचा मराठवाड्यातील ४१ लाख हेक्‍टरवरील क्षेत्राला फटका
पावसाचा मराठवाड्यातील ४१ लाख हेक्‍टरवरील क्षेत्राला फटका

औरंगाबाद : मराठवाड्यात मॉन्सूनोत्तर पावसाने तब्बल ४१ लाख ४९ हजार हेक्‍टरवरील जिरायती, बागायती, फळपिकांना फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी मराठवाड्याला २९०४ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची गरज आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील खरिपाच्या शेतीपिकांचे व फळपिकांचे मोठे नुकसान केले. नुकसानग्रस्त शेतीपिकांच्या पंचनाम्याचा निर्णय झाल्यानंतर या कामास गती आली. थेट बांधावर जाऊन पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू होती. आता नुकसान झालेल्या मराठवाड्यातील खरिपाच्या क्षेत्रासह फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे आटोपल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार मराठवाड्यात ५४ लाख ६८ हजार ३५८ हेक्‍टर क्षेत्र पेरणीलायक आहे. त्यापैकी यंदा ५० लाख २० हजार ५९१.६६ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली होती. या क्षेत्रापैकी ४० लाख ४७ हजार हेक्‍टरवरील जिरायती, ६९ हजार ४११ हेक्‍टरवरील बागायती; तर ३२ हजार हेक्‍टरवरील फळपिकांचे नुकसान झाले. 

नुकसानीपोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या नियमांच्या अधीन राहून २९०४ कोटी ४० लाख ४३ हजार रुपयांच्या निधीची आवश्‍यकता आहे. त्यामध्ये जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्‍टर ६८०० रुपये प्रमाणे २७५२ कोटी १० लाख ३२ हजार, बागायत क्षेत्रासाठी १३५०० रुपये प्रतिहेक्‍टरप्रमाणे ९३ कोटी ७० लाख ५९ हजार, तर फळपिकांसाठी हेक्‍टरी १८ हजार प्रमाणे ५८ कोटी ५९ लाख ५२ रुपयांच्या मदतीचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मदतीसाठी अपेक्षित निधीची मागणी विभागस्तरावरून शासनाकडे पाठविण्यात आल्याचेही महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सोयाबीन, मका, कपाशी, बाजरी, उडीद, मूग आदी खरिपाच्या पिकांसह फळपिकांना मोठा फटका बसला. सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले. आता अपेक्षेनुसार मदत देण्यासाठी शासन किती तडकाफडकी पावले उचलते, याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हानिहाय बाधित क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

औरंगाबाद ६०५३३८
जालना  ५२६३४१
परभणी ४५६९३३
हिंगोली २७६२५७
नांदेड ६३३४६९
बीड ७५६९२७
लातूर ५१७५७४
उस्मानाबाद  ३७६३३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com