नांदेडमध्ये खरीप पिकांना पावसाचा फटका

नांदेडमध्ये खरीप पिकांना पावसाचा फटका
नांदेडमध्ये खरीप पिकांना पावसाचा फटका

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १० मंडळांमध्ये शुक्रवारी (ता. १८) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. पाऊस काढणी सुरू असलेल्या सोयाबीन, वेचणी सुरू असलेल्या कापसासाठी नुकसानकारक तर रब्बी पेरणीसाठी फायदेशीर ठरणार आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये शुक्रवारी (ता. १८) सकाळी रिमझिम पाऊस झाला.

दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, मुखेड, किनवट, देगलूर या चार तालुक्यांतील दहा मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. सध्या या तीन जिल्ह्यांत सोयाबीनच्या काढणीची कामे वेगात सुरू आहे. कापणी केलेल्या सोयाबीनच्या गंजी शेतामध्ये लावण्यात आलेल्या आहेत. 

पावसात भिजल्याने सोयाबीनच्या शेंगावर बुरशीची वाढ होऊन दाण्याचे नुकसान होत आहे. जास्त पाऊस झालेल्या भागात सोयाबीन भिजल्याने मोड आले आहेत. बोंडातून फुटलेल्या कापसाचे नुकसान होत आहे. परंतु रब्बी पिकांच्या पेरणीसाठी जमिनीत ओलावा उपलब्ध होत असल्याने पावसाचा फायदादेखील आहे.

नांदेड जिल्ह्यात यंदा शुक्रवार (ता. १८) पर्यंत सरासरी ८५२.४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आजवर अपेक्षित सरासरी पावसाच्या ९२.१५ टक्के तर वार्षिक सरासरीच्या ८९.२१ टक्के पाऊस झाला आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांतील मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः जारिकोट ५, मुखेड १०, जांब २, मुक्रमाबाद ९, बोधडी २, जलधारा १, खानापूर ३, मरखेल २, मालेगाव २, हनेगाव २.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com