नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पुन्हा दाणादाण

नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पुन्हा दाणादाण
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पुन्हा दाणादाण

नाशिक  : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लाल कांदा, टोमॅटो, सोयाबीन, ऊस, मूग, तूर अशा पिकांचे काही भागांत नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे पीक द्राक्षाचेही नुकसान झाले असून, उत्पादक धास्तावले आहेत.  जोरदार होत असलेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. सर्वात मोठा फटका द्राक्ष बागायतदारांना बसण्याची शक्यता आहे. सध्या द्राक्ष बागांमध्ये छाटणी, पेस्टची कामे सुरू आहेत. मात्र, आता पाऊस झाल्याने त्याचा खर्च वाढला आहे. त्यातच उशिरा पेरलेल्या सोयाबीन पिकात पाणी साचल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. काही तुरळक ठिकाणी पिकांच्या सोंगण्या सुरू आहेत. अशी पिके पावसाच्या पाण्यात भिजली आहेत. काही शेतकऱ्यांच्या चाळीत उन्हाळ कांदा शिल्लक आहे तो आता सातत्याने होणारा पाऊस व उकाडा यामुळे खराब होण्यास सुरवात झाली आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे उन्हाळ कांद्याची रोपे तयार करण्याची कामे पुढे ढकलल्या जात आहे.  जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले तर धरणांच्या पाणीसाठ्यातही कमालीची वाढ झाली आहे. झालेल्या पावसाने जोरदार बरसून संपूर्ण जिल्ह्याला धुवून काढले आहे. अनेक गावांमध्ये शेतात पाणी साचले असून, काही ठिकाणी उभी बाजरी, मका, कांदा पावसाच्या तडाख्याने काही ठिकाणी जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात या पिकांना धोका निर्माण झाला आहे.  मालेगाव तालुक्यात बाजरी जमिनीवर झोपली असून, कणसे भिजली आहेत. तर चाळीत साठवलेल्या कांद्यालाही या पावसाचा फटका बसणार आहे. आर्द्रता वाढल्याने चाळीतील कांदा ओला होऊन त्याच्या सडण्याची भीती आहे. पाणी साचून जमिनीखाली असलेला भात बाहेर पडण्याची भीती आहे. विशेष करून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा तालुक्यात भात व नागली पिके या पावसामुळे अडचणीत सापडली असून, काढणीवर आलेले सोयाबीन, उडीद व मूगाच्या शेंगा फुटण्याची शक्यता आहे. या पावसाचा रब्बी पिकांना लाभ होणार असला तरी असाच पाऊस सुरू राहिल्यास खरिपाची पिके नष्ट होण्याची धास्ती शेतकऱ्यांना आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com