नाशिक जिल्ह्यात पावसाने ओढीने खरीप पिके अडचणीत

नाशिक जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके धोक्यात
नाशिक जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके धोक्यात

नाशिक : जिल्ह्यात ऑगस्टअखेर सरासरीच्या १२२ टक्के पर्जन्यमान झालेले असले तरी, गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे खरिपाची पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात प्रस्तावित पेरणीची आकडेवारी ओलांडून खरिपाच्या १०४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाच तालुक्यांत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पेरण्यांची टक्केवारी घटली आहे.  यंदा मान्सून उशिरा आल्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत खरिपाच्या जेमतेम पेरण्या झाल्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर धरल्यामुळे पेरण्यांना वेग आला. याच दरम्यान ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने नद्या, नाले दुथडी भरून वाहिले तर धरणांच्या पाणीसाठ्यातही कमालीची वाढ झाली. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या, परंतु आता पावसाने पाठ फिरविली आहे. जमिनीच्या ओलाव्यामुळे पिकांनी चांगलाच तग धरून पिके वाढली आहेत. मात्र, वाढीच्या प्रमुख अवस्थेत जमिनीतील ओलावा कमी झाल्याने धान्य पिकांची कणसे भरण्यास अडचण येत आहे. जिल्ह्यात यंदा आऑगस्ट महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली असली तरी, मालेगाव, नांदगाव, चांदवड, देवळा, येवला या तालुक्यांमध्ये अद्यापही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. अन्य तालुक्यांनी टक्केवारीची शंभरी ओलांडली आहे. परंतु पावसाअभावी या पाचही तालुक्यांमध्ये यंदा पेरणीचे क्षेत्र घटले आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस पडूनही त्याचा खरिपाला फारसा उपयोग होणार नाही, त्यामुळे ज्या क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत, तेथे आता रब्बीच्या लाल कांद्याची लागवड करण्यात येणार आहे.  जिल्ह्यात १०४ टक्के पेरण्या  नाशिक जिल्ह्यात खरिपाचे सव्वासहा लाख हेक्टर क्षेत्र असून, यंदा त्यावर १०४.९४ टक्के पेरण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ४५ हजार ५२२ हेक्टर क्षेत्र कापसाचे असून, त्यांपैकी ३६ हजार २८८ हेक्टरवर ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाच्या पाच लाख ७५ हजार ५८८ हेक्टर क्षेत्रापैकी सहा लाख ४ हजार ३७ हेक्टरवर पेरण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पाऊस थोड्या फार प्रमाणात जरी सुरू झाला असला तरी, समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com