रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा नाचणी काढणीला फटका

रत्नागिरी ः नोव्हेंबर महिन्यातही अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या नाचणी पिकाच्या काढणीला फटका बसला आहे.
Rainfall in Ratnagiri district hits harvest
Rainfall in Ratnagiri district hits harvest

रत्नागिरी ः नोव्हेंबर महिन्यातही अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या नाचणी पिकाच्या काढणीला फटका बसला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९५ टक्के कापणी पूर्ण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी झोडणी सुरु केली आहे. यंदा नाचणीचे सरासरी हेक्टरी १२ ते १३ क्विंटल उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे.

भातशेतीबरोबरच नाचणी हे शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे हमखास पीक मानले जाते. चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात नाचणीची लागवड नऊ हजार हेक्टरपर्यंत होती. ती आता ११ हजार हेक्टरवर पोचली आहे. डोंगराळ भागात, कातळावर नाचणीची लागवड करण्यासाठी शेतकरी जागा निवडतात. वातावरणाचा ताण सहन करणारे आणि कमी पाण्यात होणारे पीक आहे. त्यामुळे या जागांची निवड करत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

इतर पिकांच्या तुलनेमध्ये या पिकांवर कीड-रोग समस्या कमी आहे. त्यामुळे छोट्या क्षेत्रातही ते यशस्वीरीत्या घेता येते. खेड तालुक्यात सर्वाधिक दीड हजार हेक्टरवर लागवड होते. आहारामध्ये नाचणीचे पदार्थ सकस अन्न म्हणून वापरले जात आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यामध्ये त्याला मागणी वाढू लागली आहे. यंदा रत्नागिरी जिल्ह्यात ११ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.

नदीकिनारी भागातील जमिनीत नाचणी लागवड होत नाही. त्यामुळे अतिवृष्टीचा त्यावर मोठा परिणाम झालेला नाही; परंतु आजही जिल्ह्यात सगळीकडे पारंपरिक पद्धतीने नाचणीची लागवड केली जाते. भातशेतीची कापणी आटपून शेतकऱ्यांनी नाचणीकडे लक्ष वळवले आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस नाचणी कापणीला सुरवात झाली. राजापूर तालुक्यातील सोलगाव येथे शेतकरी सुलोचना गुरव म्हणाल्या, ‘‘यंदा अतिपाऊस असला तरीही नाचणीचे पीक समाधानकारक आहे. किडरोगांचा प्रादुर्भाव झालेला नाही. कापणी आटोपली आहे. झोडणीची कामे हाती घेतली आहेत.’’

  पारंपरिक नाचणी झोडणी पारंपरिक पद्धतीने नाचणीच्या झोडणीमध्ये आमने-सामने किमान चार-चार माणसे असतात. प्रत्येकाच्या हातात पाच ते साडेपाच फूट लांबीच्या काठ्या (दांडे) असतात. त्याच्या साहाय्याने ही माणसे आळीपाळीने नाचणीची झोडणी करतात. यामध्ये सहभागी माणसांची दांडे मारण्याची अचूक वेळ ठरलेली असते. एखाद्याची काठी मारण्याची टायमिंग चुकली तरी झोडणीमध्ये अडथळे येऊन चारपैकी एखाद्या व्यक्तीला दुखापत होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नाचणीची झोडणी करताना मोठी कसरत करावी लागत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com