सातारा जिल्ह्यात पावसाचा १५ हजार हेक्टर पिकांना फटका

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे १५ हजार ६६३ हेक्टरवरील रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Rainfall in Satara district 15,000 hectares of crops hit
Rainfall in Satara district 15,000 hectares of crops hit

सातारा : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे १५ हजार ६६३ हेक्टरवरील रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका माण, खटाव तालुक्यांना बसला असून त्यापाठोपाठ कोरेगाव, फलटण, वाई व महाबळेश्वर तालुक्यांतही मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कांदा, रब्बी ज्वारी, स्ट्रॉबेरी, मका, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता या नुकसानीच्या प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरवात झाली आहे. मागील वेळी झालेल्या वादळामुळे झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीच्या भरपाईचा पत्ता नसताना आता या अवकाळीने नुकसानीची तरी तातडीने भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त  होत आहे.  जिल्ह्यात डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये रब्बी ज्वारीचे सर्वाधिक नुकसान असून, अनेक ठिकाणी ज्वारी पडली आहे. तर कांदा पिकाला पावसाने झोडपल्याने लागण केलेली रोपे वाफ्यात पाणी तुंबल्याने कुजली आहेत. तर काही ठिकाणी रोपे पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहेत. कांदा पिकाचे सुमारे चार हजार ४०७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ मका आणि नगदी पीक द्राक्ष, स्ट्रॅाबेरीचे मोठे नुकसान आहे. महाबळेश्वर तालुक्यात ४५० हेक्टरवरील स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी बाद झाल्याने बांधावर काढून  टाकली आहे.  कृषी विभागाने दिलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालात जिल्ह्यातील शेतीचे १५ हजार ६६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका कांदा, रब्बी ज्वारी, द्राक्ष, स्ट्रॉबेरीचा समावेश आहे. सध्या या नुकसानीचे गावनिहाय पंचनामे सुरू असून, शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीबाबतचा कागदपत्रांसह फॉर्म भरून कृषी सहायकांकडे किंवा ग्रामपंचायतीकडे द्यायचा  आहे.

तालुकानिहाय नुकसानीची  आकडेवारी (हेक्टरमध्ये)  सातारा ७९, कोरेगाव १७८०, खटाव २८६९, महाबळेश्वर ४९०, वाई ३०७, जावळी २६, फलटण २२५, माण ९८२६, कऱ्हाड ४७, पाटण १२. या नुकसानीचे प्रत्यक्ष गावनिहाय पंचनामे सुरू असून यामध्ये आणखी वाढ होणार आहे. सर्वाधिक नुकसान माण तालुक्यात असून, यामध्ये रब्बी ज्वारीचे ४६२१, मका १००६, गहू १७३, हरभरा ११०, कांदा ३०४३, भाजीपाला ३८४, द्राक्ष १८९, डाळिंब १५८, इतर पिकांचे १४१ हेक्टरवर नुकसान झाले.

भरपाई कधी?  प्रत्येक वेळी वादळ असो की अवकाळी पाऊस असो...शेतीच्या नुकसानीचे पंचमाने होतात. पण, तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते. काही वेळेस नुकसान झालेले शेतकरीच वंचित राहतात. तसेच स्थानिक राजकारणातूनही काही ठिकाणी बाधित शेतकऱ्यांना वंचित ठेवले जाते. त्यामुळे कृषी विभागाने गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना सक्त सूचना करून कोणीही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, याची दखल घेणे गरजेचे आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com