सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोर कायम

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोर कायम
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोर कायम

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सलग सहाव्या दिवशी विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला. वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीवरील संकट गडद होऊ लागले आहे. शेतकऱ्यांची चिंता दिवसागणिक वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दसऱ्याची रात्र पावसाने चांगलीच गाजवली. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. संगमेश्‍वरसह रत्नागिरीत दोन ठिकाणी वीज पडली. त्यात एक मुलगा ठार झाला. रत्नागिरीत दोन गुरे दगावली. अचानक आलेल्या पावसामुळे भात खाली पडली. वादळी वाऱ्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

सकाळच्या सत्रात कडक ऊन आणि सध्यांकाळी तीन-चार वाजता विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हे नित्याचे बनले आहे. वैभववाडीत तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सुमारे दोन तास सुरू होता. दोडामार्ग तालुक्यातदेखील विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला. सह्याद्री पट्ट्यात रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. 

जिल्ह्यातील शेकडो एकर क्षेत्रावरील भातशेती कापणीला आली आहे. परंतु, सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यात अडथळा येत आहे. त्यातच चक्रीवादळ, सुसाट्याचा वारा यामुळे भातशेती कोलमडून पडू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस येत्या एक दोन दिवसांत कमी झाला नाही, तर भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरुवात केली आहे.

रत्नागिरीत भातशेती, घरांचे नुकसान 

संगमेश्‍वर तालुक्यातील नांदळज बौध्दवाडी येथील सुशांत विश्‍वास कांबळे या तरुणाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. ८) सायंकाळच्या सुमारास घडली. तसेच, रत्नागिरी तालुक्यात तरवळ येथे गोठ्यावर वीज पडून तीनपैकी दोन गुरे मृत्यूमुखी पडली. वादळाने ओरीसह धामणसे गावाला तडाखा बसला. त्यात चार घरांचे मोठे नुकसान झाले. 

रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्यांत पावसाचा जोर चांगलाच होता. मंगळवारी रात्रभर पाऊस कोसळत होता. पावसाने भातशेतीला धक्का दिला आहे. कापणीसाठी तयारी झालेली पिके आडवी पडली. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले. कापलेल्या भातातही पाणी साचल्याने शेतकऱ्याला दुहेरी काम लागले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com