नगर जिल्ह्यातील १९ महसूल मंडळांत कमी पाऊस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर : जिल्ह्यामधील १९ महसूल मंडळांत अजूनही पुरेसा पाऊस नाही. पारनेर तालुक्‍यातील वाडेगव्हाण महसूल मंडळात तर अवघा १७ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. सध्या फक्त अकोले तालुक्‍यात पाऊस सुरू आहे. पाणलोटात पाऊस होत असल्याने भंडारदरा, निळवंडे आणि काही प्रमाणात मुळा धरणात पाण्याची आवक होत आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांत  पावसाची प्रतीक्षा आहे.

पावसाळा सुरू होऊन जवळपास सव्वा महिना झाला आहे. मात्र अजूनही  बहुतांश भागाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने पेरणीला अडचणी येत आहेत. मात्र आता उशीर होत असल्यामुळे अल्प पावसावरच पेरण्या आणि कापूस लागवड उरकली जात आहे. गुरुवारी जिल्हाभरात पावसाची भुरभुर सुरू होती.

मात्र आतापर्यंत जिल्हाभरातील पेडगाव, काष्टी, मांडवगण, देवदैठण (ता. श्रीगोंदा), माही जळगाव, मिरजगाव (ता. कर्जत), अरणगाव (ता. जामखेड) पुणतांबा (ता. राहाता), कुकाणे (ता. नेवासा), कापुरवाडी, वाळकी (ता. नगर), बोधेगाव, चापडगाव, एरंडगाव (ता. शेवगाव), वडझिरे, वाडेगव्हाण, पळशी (ता. पारनेर) तळेगाव, पिंपरणे (ता. संगमनेर) या महसुल मंडळांत ८० मिमीपेक्षा कमी पाऊस आहे. अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागात दरवर्षी जोरदार पाऊस असतो. यंदा त्या भागात दरवर्षीसारखा पाऊस नसल्याचे सांगितले जात आहे.

सध्या अकोले तालुक्‍यात पाऊस सुरू असल्याने तालुक्‍यातील आंबीत आणि पिंपळगाव खांड, वाकी धरण भरले आहे. सध्या मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणात पाण्याची आवक सुरू आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस सुरेगाव (ता. कोपरगाव) महसूल मंडळात झाल्याची प्रशासनाकडे नोंद आहे.  

शुक्रवारी सकाळपर्यंत झालेला पाऊस (मिमी) ः भंडारदरा ७४, वाकी ५८, पांजरे ९७, रतनवाडी ८९, घाटघर १०६, निळवंडे १९, अकोले, ७, कोतूळ ६, लोणी ः १४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com