विदर्भात पावसाने गाठली सरासरी 

सप्टेंबरच्या पूर्वार्धात वरुणराजाची अनपेक्षित कृपादृष्टी झाल्याने तूट भरून निघाली आहे. सर्वत्र झालेल्या दमदार पावसामुळे विदर्भात सरासरी गाठली आहे.
विदर्भात पावसाने गाठली सरासरी  Rainfall in Vidarbha reached average
विदर्भात पावसाने गाठली सरासरी  Rainfall in Vidarbha reached average

नागपूर : सप्टेंबरच्या पूर्वार्धात वरुणराजाची अनपेक्षित कृपादृष्टी झाल्याने तूट भरून निघाली आहे. सर्वत्र झालेल्या दमदार पावसामुळे विदर्भात सरासरी गाठली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार या वर्षी आतापर्यंत पुरेसा पाऊस झाल्याने खरिपांसह भविष्यात रब्बी पिकांनाही फायदा होणार असल्याने बळीराजाही खूष आहे.  जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने विदर्भातील स्थिती काहीशी चिंताजनक होती. मात्र, सर्वात कमी पावसाच्या सप्टेंबरमध्ये वरुणराजाने कृपा केल्याने तूट भरून निघाली. दमदार पावसामुळे पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत रेड झोनमध्ये असलेले जिल्हे ही आता सरासरीच्या आसपास आले आहेत. प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, विदर्भात १ जूनपासून आतापर्यंत ८४६ मिलिमीटर पाऊस झाला, जो सरासरी पावसाच्या (८७९ मिलिमीटर) केवळ चार टक्के कमी आहे. हवामान विभागाच्या भाषेत हा सरासरी पाऊस मानला जातो. 

गोंदिया अव्वल, बुलडाणा पिछाडीवर  विदर्भात सर्वाधिक पाऊस गोंदिया जिल्ह्यात (१०७२ मिलिमीटर) झाला असला तरी, सरासरी पावसात हा जिल्हा अजूनही अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मागे आहे. येथे आतापर्यंत सरासरीच्या १० टक्के कमी पाऊस पडला आहे. तर सर्वाधिक १५ टक्के तूट गडचिरोली जिल्ह्यात आहे. सरासरीत यवतमाळ जिल्ह्याने मात्र बाजी मारली आहे. येथे सरासरीच्या तब्बल १५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. नागपूर जिल्ह्यातही सरासरीच्या नऊ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भात सर्वात कमी पाऊस दुष्काळग्रस्त असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात (५५४ मिलिमीटर) झालेला आहे. 

खरीप उत्तम, रब्बीलाही फायदा  अधिकृत पावसाळा संपायला अजून पंधरा दिवस शिल्लक असल्याने उरलेल्या दिवसांमध्ये आणखी पाऊस अपेक्षित आहे. समाधानकारक पावसामुळे खरीप पिकांची स्थिती उत्तम असून, रब्बीलाही याचा फायदा होणार आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता, जो पूर्णपणे खरा ठरण्याची दाट शक्यता आहे. विदर्भात दरवर्षी चार महिन्यांमध्ये सरासरी ९४३ मिलिमीटर पाऊस बरसतो, हे विशेष.  विदर्भातील आतापर्यंतचा  पाऊस (मिलिमीटरमध्ये) 

जिल्हानिहाय प्रत्यक्ष पाऊस (सरासरी जास्त आणि तूट) 

  • नागपूर ९३४ ८५५ +९ 
  • अकोला ६२४ ६४० -३ 
  • अमरावती ६९५ ७९६ -१२ 
  • वर्धा ८३३ ८१४ +२ 
  • यवतमाळ ८६० ७४६ +१५ 
  • भंडारा ९९३ १०८४ -८ 
  • गोंदिया १०७२ ११५१ -१० 
  • चंद्रपूर ९९६ १०१३ -२ 
  • गडचिरोली ९९३ ११८३ -१५ 
  • वाशीम ८०८ ७२९ +११ 
  • बुलडाणा ५५४ ६०५ -९
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com