सोलापुरात पावसाने पिकांचे मोठे नुकसान

सोलापुरात पावसाचा पुन्हा दणका
सोलापुरात पावसाचा पुन्हा दणका

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा मॉन्सूनोत्तर पावसाने माळशिरस, करमाळा, बार्शी व मोहोळ तालुक्‍याला चांगलेच झोडपले. परिणामी, परिसरातील ओढे, नाले, तलाव तुडुंब भरले आहेत. अनेक गावांचे मार्ग बंद झाले आहेत. या पावसामुळे आधीच तूर, सोयाबीन, डाळिंब, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात आता कांदा आणि भाजीपाला पिकांना दणका बसला आहे. 

माळशिरस तालुक्‍यात यंदा मॉन्सूनोत्तर पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. तालुक्‍यातील नीरा व भीमा नदीसह महादेवाच्या डोंगररांगेत उगम पावणारे ओढे, ९८ पाझर तलाव, २० गावतलावांसह बंधारे, पाझर तलाव १०० टक्के क्षमतेने भरलेले आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील अंदाजे तीन हजार हेक्‍टर पिके व रब्बी हंगामात पेरलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाणी सध्या ओसंडून वाहत आहे. 

दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १६ गावांत अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या बचेरी, पिलीव, गारवड, जळभावी, रेडे, भांब, कारुंडेसह ९८ पाझर तलाव व २० गावतलाव यंदा पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. तालुक्यातील मोठ्या तलावांपैकी निमगाव, माळेवाडी, गिरझणी, विझोरी, खंडाळी तलावात नीरा उजवा कालव्याचे पाणी व पावसाचे पाणी आल्यामुळे तलावही तुडुंब भरले आहेत. 

सांगोल्यात सोमवारी (ता. ४) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे ज्वारीबरोबरच डाळिंब, द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. 

नदी, नाले, ओढे अनेक वर्षांनंतर खळखळून वाहू लागले आहेत. नदी, ओढ्यावरील बंधारेही भरले आहेत. तालुक्‍यातील सर्वच मंडलांमध्ये पावसामुळे पिके वाया गेली आहेत. या अगोदर सतत पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे डाळिंब, बोर, द्राक्ष पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग पसरला आहे. ज्वारी, मका पिके पाण्यामुळे पिवळी पडू लागली आहेत. तालुक्‍यात २९ हजार ५१७ हेक्‍टर ज्वारीच्या क्षेत्रापैकी २१ हजार ९५८ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. एकूण ३८ हजार ९४२ रब्बी पेरणी क्षेत्रापैकी २२ हजार ३३९ हेक्‍टर पेरणी झाली आहे. 

मंगळवेढा तालुक्‍यात उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे ही संथ गतीने चालू असून, शेतकरी नुकसान कसे भरून काढायचे, या चिंतेत आहेत. तालुक्‍यात एक ऑक्‍टोबरनंतरच्या पावसाने खरीप व रब्बी पेरणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान केले. फाळबागा, भाजीपाला व विशेषतः कांदा पिके उद्‍ध्वस्त झाली आहेत. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु कर्मचाऱ्यांना नेमके किती नुकसान झाल्यानंतर पंचनामे करायचे, पिकांचे नुकसान कसे ठारवायचे, याबाबत सविस्तर माहिती नसाल्याने पंचनामे अतिशय संथ गतीने सुरू आहेत. 

शेतकरी आर्थिकदृष्ट्या देशोधडीला

मंगळवेढ्यात खरीप व रब्बी पिके, डाळिंब व द्राक्ष फाळबागा, कांद्यासह सर्व भाजीपाला पिके, शेडनेट हाउसमधील रंगीत व हिरवी ढोबळी मिरची यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षी दुष्काळाने शेतकरी संकटात आला होता. आता पावसाने होते तेवढे संपले. आता बॅंकांची कर्जे कशी फेडायची, ही चिंता आहे. शासानाच्या तुटपुंजा मदतीने शेतकऱ्यांचे नुकसान भरून येणार नसून शासनाने जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत बॅंकांच्या करजवसुलीला वर्षभर मुदत वाढ देऊन कर्जावरील व्याज शासनाने भरले, तरच शेतकरी या संकटातून बाहेर निघेल.

बार्शीत पावसासोबतच पंचनाम्यांचा जाच

बार्शी तालुक्‍यातील १३८ गावांतील हजारो क्षेत्राच्या नुकसान पंचनाम्यांच्या त्रासाने शेतकरी वर्ग वैतागला आहे. लाखो रुपयांचे नुकसान होऊनही हजारो रुपयांच्या मत निधीसाठी शेतकरी हतबल झाला आहे. कसं-बसं आलेल्या पिकांचं पावसानं होत्याची नव्हतं केलं. असा निसर्गाचा लहरीपणा बळिराजाला जड झाला आहे. अशावेळी नुकसानीच्या ‘अशांश -रेखांश पिकाचा फोटो जोडा’, ‘पीकविमा भरलेली पावती जोडा’, ‘पीकपेरा कॉलम भरा’, अशा अनेक जाचक अटी - नियमाच्या त्रासामुळे शेतकरी संतापले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com