खानदेशात शेतीच्या कामांमध्ये पावसाचा अडथळा

जळगाव : खानदेशात मागील महिनाभर पाऊस सुरू होता. या आठवड्यात सुरवातीला पाऊस थांबला. परंतु, मागील दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस येत आहे. त्यामुळे शेतीकामांना अडथळा येत आहे.
Rains hinder agricultural activities in Khandesh
Rains hinder agricultural activities in Khandesh

जळगाव : खानदेशात मागील महिनाभर पाऊस सुरू होता. या आठवड्यात सुरवातीला पाऊस थांबला. परंतु, मागील दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस येत आहे. त्यामुळे शेतीकामांना अडथळा येत आहे. पिकांची स्थितीही बिकटच आहे. यामुळे खरिपातील सर्वच पिकांवर परिणाम होईल, असे चित्र आहे.

खानदेशात ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पावसापेक्षा सुमारे १६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. प्रकल्पांमध्ये जलसाठा बऱ्यापैकी आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते सप्टेंबर महिना सुरू होईपर्यंत पाऊस सुरूच  होता. अनेक भागात हलका व मध्यम पाऊस झाला. तर, सातपुडा पर्वत व लगत चांगला पाऊस या दरम्यान झाला. अतिपावसात मूग, उडीद ही पिके हातची गेली आहेत. हलक्या व मुरमाड भागातील उशिरा पेरणीचा उडीद तेवढा काही प्रमाणात हाती येईल. तसेच पूर्वहंगामी कापूस, ज्वारी या पिकांनाही तडाखा बसला आहे. 

सोयाबीनला पावसाची तूर्त गरज नाही. पुढे फक्त कोरडवाहू कापसाला हलक्या, मुरमाड जमिनीत पावसाची गरज राहील. परंतु, अपवााद वगळता पिकांना पावसाची गरज नाही. पिकांची स्थिती सुधारण्यासाठी पाऊस थांबायला हवा. स्वच्छ सूर्यप्रकाश हवा. हवा खेळती असावी. कोरडे व सूर्यप्रकाशीत वातावरण राहिले, तर खालावलेली कापूस, ज्वारी पिकांची स्थिती सुधारेल. तसेच शेतमालाचा दर्जाही सुधारेल.

उशिराचा उडीद, पुढे सोयाबीन मळणीलादेखील सुकर स्थिती कोरड्या, सूर्यप्रकाशीत वातावरणामुळे तयार होईल. परंतु गेल्या आठवडाभरापासून आर्द्रता व उकाडा प्रचंड वाढला आहे. खेळती हवा नाही. तसेच अधूनमधून हलका व मध्यम पाऊस येत आहे. 

उडीद मळणी ठप्प

गुरुवारी (ता.३) व शुक्रवारी (ता.४) खानदेशात काही भागांचा अपवाद वगळता हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. यामुळे शेतीकामांना अडथळा येत आहे. फवारणी, उडीद मळणी, तणनियंत्रण आदी कामे ठप्प होत आहेत. मजुरी खर्च वाढत आहे. शेतकरी या प्रतिकूल स्थितीमुळे मेटाकुटीस आला आहे.

पाऊस थांबायला हवा. वातावरणही सूर्यप्रकाशीत हवे. परंतु, अधूनमधून हलका पाऊस येतच आहे. ढगाळ व प्रतिकूल वातवरण कायम आहे. यामुळे पीक स्थितीही सुधारत नसल्याचे चित्र आहे. - रमेश पाटील, शेतकरी, रावेर (जि.जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com