अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस उत्पादकांमध्ये धास्ती 

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात बहुतांश तालुक्यात मागील दोन दिवसांत पाऊस झालेला आहे. अद्यापही पावसाचे वातावरण कायम असल्याने सोयाबीन काढणीला आलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
पावसामुळे सोयाबीन, कापूस उत्पादकांमध्ये धास्ती  Rains threaten soybean, cotton growers
पावसामुळे सोयाबीन, कापूस उत्पादकांमध्ये धास्ती  Rains threaten soybean, cotton growers

अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात बहुतांश तालुक्यात मागील दोन दिवसांत पाऊस झालेला आहे. अद्यापही पावसाचे वातावरण कायम असल्याने सोयाबीन काढणीला आलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची सोंगणी करून ठेवली असून, पीक ओले होत असल्याने शेतकरी चिंतातूर झालेले आहेत. गेल्या २४ तासांत अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळी तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये पावसाची नोंद झालेली आहे.  सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू होत आहे. जूनच्या सुरुवातीला लागवड असलेले सोयाबीन काढणीस आलेले आहे. काही शेतकऱ्यांनी आताचा पाऊस सुरू होण्यापूर्वी सोयाबीन काढणीही केली. परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीसाठी तयार होत आहे. शेंगा वाळण्याची प्रक्रिया सुरू झालेली असतानाच पाऊस येत आहे. मागील ४८ तासांत या भागात चांगला पाऊस झाला. आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे. त्यामुळे तयार असलेले सोयाबीन सोंगणी, मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांची एकच लगबग सुरू होती. त्यातच पावसाने हजेरी दिल्याने हे काम अनेक ठिकाणी थांबले आहे. सोंगणी केलेले सोयाबीन अनेक शेतकऱ्यांना खराब होण्याची भीती वाटत आहे. पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा असला, तरी यामुळे सोंगणीचे काम प्रभावित होत आहे. वाळलेल्या शेंगावर सुद्धा बुरशी निर्माण होण्याची शक्यता आहे. 

सोयाबीनमध्ये ओलावा अधिक, दर कमी  काढणी केलेले सोयाबीन ओलसर असल्याने या मालाला बाजारात सध्या जेमतेम दर व्यापारी देत आहेत. तयार सोयाबीन सुकवण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाशही सध्या मिळेनासा झालेला आहे. अशा स्थितीत शेतकरी तयार असलेले सोयाबीन मिळेल, त्या दरात व्यापाऱ्यांना विकून मोकळे होत आहेत. ओलसर सोयाबीनचा दर अवघा तीन ते साडेतीन हजारांपासून सुरू होत आहे. तर कमाल दरही ५५००च्या आतच बाजारात मिळत आहे. 

कापूस पट्ट्यातही नुकसान  पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे. सलग तीन ते चार दिवसांपासून कधी पाऊस तर कधी दिवसभर ढगाळ वातावरण तयार झालेले असते. यामुळे वेचणीला आलेला कापूस खराब होत आहे. प्री-मॉन्सून क्षेत्रात यंदा दसऱ्याच्या आधीच काही भागात कापसाची वेचणी सुरू झालेली आहे. हा ओलसर कापूस सुकविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com