वऱ्हाडात दिवाळी सणावर पावसाचे संकट

यावर्षी ज्वारीचे पीक पेरले होते. अतिशय चांगल्या प्रकारे पीक दिसत असताना गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने कणसांमधून कोंब उगवले. त्यामुळे आता ज्वारी पीक कोणत्याच कामाचे राहिलेले नाही. जनावरांचा चारासुद्धा खराब झाला. शासनाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची तसेच शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे. -विजय खंडारे, शेतकरी,पिंपळगावराजा जि. बुलडाणा.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः या भागात गेल्या आठवडाभरापासून सातत्याने मध्यम ते हलक्या स्वरूपातील पाऊस होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसामुळे दिवाळीसारख्या मोठ्या सणावर संकटाचे मोठे सावट आहे.

या भागात सध्या सोयाबीन हंगाम अर्ध्यावर आलेला आहे. काही ठिकाणी ज्वारीची कापणी सुरू झाली. कापसाची वेचणीसुद्धा करण्याची कामे सुरू झाली होती. परंतु, या कालावधीतच मॉन्सूनोत्तर पावसाने आठवडाभरापासून ठाण मांडले आहे. परिणामी, दिवाळी सणाच्या आनंदावर विरजण पाडत आहे. बाजारपेठेत तितकीशी उलाढाल नसल्याचे चित्र आहे.  गेल्या काही वर्षांपासून शेतकरी दुष्काळाने होरपळून निघत आहे. यावर्षी जास्त पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांची दाणादाण होत आहे. यावर्षी हंगामात पहिला महिना सोडला तर नंतरच्या काळात पाऊस नियमित झाला. सर्वच पिके चांगल्या स्थितीत होती. त्यामुळे यंदा उत्पादन वाढून दोन पैसे अधिक मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांची अवस्था वाईट असल्याचे विदारक चित्र शेतांमध्ये दिसत आहे.

सोंगणी केलेल्या ज्वारीच्या कणसांमधून अक्षरशः कोंब बाहेर फुटले. शेतांमध्ये  लावलेल्या सोयाबीनच्या सुड्या, ज्वारीच्या कणसांचे लावलेले ढिगारे पाण्याखाली आहेत.  गेल्या आठ दिवसांत पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांसह चाराही खराब झाला. येत्या काळात चाराटंचाईचे संकट अधिक वाढू शकते. शासनाने सर्वत्र पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com