सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने नद्या दुधडी भरून वाहत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली असल्याने कुजू लागली आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण सरासरी ५५.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात संततधार पावसामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी पश्चिम भागात दमदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतजमीन उफाळू लागल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. अनेक शेतात ओढ्याचे पाणी आल्याने शेतजमीन वाहू लागली आहे. शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली बांधबदिस्ती वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. नदीची पाणी पातळी कमी होत नसल्याने कृषिपंप पाण्याखाली आहेत. तसेच बॅलर बसविण्यात आलेले कृषिपंप वाहून गेले आहेत. 

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरण क्षेत्रातील कोयना २४९, नवजा २६५, महाबळेश्वर २३२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात सकाळी अकरा वाजता १०२.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने सकाळी अकरा वाजता पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आले आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे १६ फुटांवरून १४ फुटांवर आणण्यात आले आहे. 

सध्या धरणातून एक लाख नऊ हजार ९० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कण्हेर, उरमोडी धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. कण्हेर धरणातून ९,७३४, उरमोडी धरणातून ६,७८०, धोम धरणातून १९,६२०, तारळी धरणातून ८,८७२ व धोम-बलकवडी धरणातून ५,०८८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

तालुकानिहाय मिलिमीटर व कंसात एकूण पाऊस  सातारा-  ५७.२८ (१४४०.५३), जावळी- ११९.४२ (१७८२.६७), पाटण- ८८.९१ (१५४०.८५), कराड- ५१.६९ (८३६.३१), कोरेगाव-  २५.५६ (५९०.४४), खटाव- १५.१० (३६५.४४), माण-  ०.५७ (१५०.२७), फलटण- ३.०० (१८२.२२), खंडाळा- २०.६५ (४६३.७०), वाई- ५९.११ (७४७.६०), महाबळेश्वर- २८०.४५ (५२८८.३१). 

प्रमुख धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये  कोयना १०२.४३, धोम-१०.१४, धोम-बलकवडी-३.४६, कण्हेर-८.४८, उरमोडी-८.९९, तारळी-५.१५, नीरा देवघर-११.२७, भाटघर-२२.८६, वीर-८.६०.

पाटण तालुका पाण्यातच पाटण, जि. सातारा ः मुसळधार पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी पूरस्थिती कायम आहे. शहर तीन दिवसांपासून पाण्यातच आहे. सकस दूध प्रकल्प, पाटण तालुका दूध संघालाही पुराचा फटका बसला आहे. शेकडो लिटरच्या दुधाचे संकलन ठप्प आहे. तालुक्‍यातील पाच पूल पाण्याखाली गेल्याने ५० हून अधिक गावांचा संपर्कच तुटला आहे. कऱ्हाड ते चिपळूण रस्त्यावरही अद्याप पाणी असल्याने तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्या मार्गावरील दळणवळणावरही परिणाम झाला आहे. नदीकाठच्या सुमारे ५० हून अधिक गावांना कोयनेच्या पाण्याचा विळखा पडला आहे. 

कोयनेतून होणारा विसर्ग व पावसांची संततधार यामुळे शहर तीन दिवसांपासून पाण्यात आहे. शहरातील शंभराहून अधिक कुटुंबांना स्थलांतरित केले आहे. ४०० लोकांना पुराची झळ बसली आहे. त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरही करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी कोयना नदीच्या पाण्याने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. ती अद्यापही कायम आहे. शासन पूररेषेतील कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी धडपडत आहे. महापूर अंगवळणी पडलेल्या येथील जनतेला त्याचे गांभीर्य सोमवारी सकाळी कळले आणि पळापळ सुरू झाली. गाफील राहिल्याने शहराचा ३० टक्के भाग पाण्याखाली आहे. 

कऱ्हाड ते चिपळूण महामार्गासह नगरपंचायत इमारत, त्याच्या शेजारील नागरी वस्ती, विठ्ठल मंदिर परिसर, जुना मूळ गाव रस्ता, कळसे वस्ती, झेंडा चौक, चाफोली रस्ता दोन्ही बाजू, बस स्थानक परिसर पाण्याखाली आहे. नागरी वस्ती असल्याने तेथील १०० हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. त्या भागात व्यापाऱ्यांच्या दुकानातही पाणी साचून राहिले आहे. स्थलांतरित झालेल्यांचे साळुंखे हायस्कूल व भाजीपाला मार्केटमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. काही ठिकाणी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी पहाटेपासून सक्तीने मोहीम राबविली आहे. काही कुटुंबे नातेवाइकांकडे गेली आहेत. पुलाच्या पाण्याने शहराला दोन्ही बाजूने घेरले आहे. 

पाटण दूध संघ व सकस प्रकल्पाचे दूध संकलन होऊ शकलेले नाही. दोन्हीकडे किमान २५ हजारांचे दूध संकलन होते. मात्र, तालुक्‍यातील पूर्ण वाहतूक ठप्प असल्याने दूध संकलन होऊ शकलेले नाही. त्यामुळे त्याच्याही उलाढालीवर परिणाम झाला आहे. पुरामुळे आठवडा बाजारांवर परिणाम झाला आहे. रविवारचा कोयना व पाटणचा सोमवारी तर मल्हारपेठचा आज बुधवारी भरणारा आठवडा बाजार रद्द झाला आहे. 

त्यामुळे त्याच्याही उलाढालीवर परिणाम झाला आहे. तीन दिवस बाजारपेठ बंद पडल्याने भाजीपाल्यासारख्या जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा भासू लागला आहे. नगरपंचायत परिसरातील व चिपळूण महामार्गाच्या शेजारील दुकाने पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाटण आगारात पाणी, विजेचा लपंडाव, नळपाणीपुरवठा जॅकवेल पाण्यात, भाजीपाला व दुधाचे वितरण बंद अशा अवस्थेत शहरवासीयांची कोंडी झाली असून, पाऊस उघडण्याची सर्वजण वाट पाहत आहेत. सलग तीन दिवस जलप्रलयाची वाढणारा व्याप्ती पाहण्यापलीकडे काहीही करता येत नसल्याने सर्वजण हतबल आहेत.

कराड शहरातील पूर ओसरतोय सातारा ः कराड शहरात कृष्णा, कोयनेचा संगम असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते. ते दत्त चौकापर्यंत आले होते; पण आता ते चार फुटांनी कमी झाले आहे. पूर ओसरत आहे, त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे कराडचे उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले. कोयना, धोम या धरणांचे पाणी मोठ्या प्रमाणात अनुक्रमे कोयना आणि कृष्णा नद्यांमध्ये विसर्ग करावे लागत आहे; पण आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्ग कमी होऊ शकतो. तथापि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकाचेच्या मुख्यमंत्र्यांशी मंगळवारी चर्चा केल्यानंतर अलमट्टी धरणातून सकाळी सहापासून चार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे झपाट्याने पुराच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. कराड शहरातील दत्त चौकापर्यंत आलेले पाणी बुधवारी सकाळी नऊपर्यंत चार फुटांनी ओसरले. त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे श्री. खराडे यांनी आवाहन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com