रत्नागिरीत पावसाचे थैमान

रत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या पावसाने थैमान घातले आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर पाण्यात गेले आहे. नद्यांवरील छोटे-मोठे पूल पाण्याखाली आहेत.
Rainy weather in Ratnagiri
Rainy weather in Ratnagiri

रत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या पावसाने थैमान घातले आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर पाण्यात गेले आहे. नद्यांवरील छोटे-मोठे पूल पाण्याखाली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. नदीकिनारी भागातील हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. रत्नागिरीत टेंभे येथे एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली. चिपळूणमध्ये २००५ प्रमाणे पूरस्थिती आहे. अनेक कुटुंब पुरामध्ये अडकून पडली आहेत.

बुधवारी रात्रभर झालेल्या ढगफुटीने वाशिष्ठी आणि शिव नदीला पुर आला. चिपळूण शहरासह आजूबाजूची गावे जलमय झाली. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये सात फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

चिपळूण शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड , भोगाळे , परशुराम नगर, रॉयल नगर, राधाकृष्ण नगरमधील घरे पाण्याखाली आहेत. अतिवृष्टी, हायटाईड आणि कोयनेचे पाणी यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.  बचावकार्यासाठी स्थानिक चिपळूण नगरपालिका २ बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे.

रत्नागिरीमधून १, पोलिस विभागाकडील १ व कोस्टगार्डची १ बोट अश्या ३ बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविण्यात आल्या. पुणे येथून एनडीआरएफची दोन पथके आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी तटरक्षक रक्षक दलाचे हेलिकॉप्टर दाखल झाले होते.

जगबुडी नदीच्या पुराचे पाणी खेड शहरात शिरले. संगमेश्वर  निवदेकडे जाण्यासाठीचा बावनदीवरील पूल वाहून गेला. रत्नागिरीत चांदराई बाजारपेठेत पाणी शिरल्याने शंभरहून अधिक दुकानांचे अंशतः नुकसान झाले. टेंभ्ये बौध्दवाडी येथील आशा प्रदीप पोवार (वय ५४) कोरोना लस घेण्यास जात असताना वाहून गेल्या. 

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

उक्षी येथे पुराचे पाणी घरात भरल्याने अंशतः नुकसान झाले. वाशिष्ठी पुलाला पाणी लागल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूकही बंद ठेवण्यात आली. जगबुडी, वाशिष्ठी, बावनदी, कोदवली, काजळी, अर्जुना, कोदवली, सोनवी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com