जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
बातम्या
प्रतिकारशक्ती वाढीसाठी बेदाण्याचा वापर वाढला
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मागणीत वाढ होत असून, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या आहारात बेदाण्याचा वापर वाढला आहे.
सांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मागणीत वाढ होत असून, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या आहारात बेदाण्याचा वापर वाढला आहे. परिणामी, बेदाणा दरात तेजी आहे. सध्या बेदाण्याला प्रति किलोस ११० ते २२५ रुपये असा दर मिळत असून, गेल्या तीन ते चार महिन्यांत दरात प्रति किलोस ५० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे. भविष्यात बेदाण्याच्या दरात वाढ होईल, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षी राज्यात बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाले होते. त्यामुळे बेदाण्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली होती. त्याचे कारण म्हणजे कोरोना विषाणूचे आलेले संकट. परंतु गेल्या वर्षी उत्पादन झालेला बेदाणा अधिक शिल्लक राहील, अशी भीती निर्माण झाली होती. त्यानंतर बाजारपेठा सुरू झाल्याने बेदाण्याची मागणी वाढू लागल्याने बेदाण्याच्या दरात ५ ते १० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर दरात टप्प्याटप्प्याने वाढ होण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लोकांनी आहारात ड्रायफ्रूटचे सेवन करण्याचे प्रमाणात वाढले असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. त्यामुळे बेदाण्याचीही विक्रीही वाढली असल्याने दरात वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत ५० ते ६० रुपयांनी दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
राज्यात दरवर्षी सुमारे १५ ते २० हजार बेदाणा शिल्लक राहतो. हा बेदाणा शिल्लक राहिल्याने तो पुढील हंगामात विक्री केला जातो. परंतु गेल्या वर्षीचा, परंतु दरवर्षीच्या तुलनेत यंदा बेदाणा १० ते १५ हजार टन बेदाणा शिल्लक आहे. त्याचबरोबर गेल्या पंधरा दिवसांपासून बाजारात नवीन बेदाणा सौद्यासाठी येऊ लागला आहे. देशातील विविध ठिकाणी नव्या बेदाण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे व्यापारी नव्या बेदाणा खरेदी करण्यासाठी पुढे येत आहे. परंतु नवीन बेदाणा हंगामाला अजून गती आलेली नाही. येत्या आठ ते दहा दिवसांत गती येऊन नवीन बेदाण्याच्या आवकीत वाढ होईल. त्याचबरोबर जुना बेदाणाही याची विक्री मागणी करू लागले आहेत.
बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यात होळी सण मोठा साजरा केला जातो. या दरम्यान, राज्यातून बेदाण्याला मोठी मागणी असते. त्यामुळे खरेदीसाठी व्यापारी पुढे येतात. स्पर्धेतून बेदाण्याला दर चांगला मिळत आहे.
बेदाणा दर (प्रति किलो)
पिवळा ः १०५ ते १६०
हिरवा ः ११० ते २२५
काळा ः ३० ते ७०
बाजाराची स्थिती
- गेल्या तीन महिन्यात ५० ते ६० रुपयांनी वाढ
- शिल्लक बेदाणा ः १० ते १५ हजार टन
- नवीन बेदाण्याची आवक कमी अधिक
- १० मार्चनंतर बेदाण्याची निर्यात होण्याची शक्यता
प्रतिक्रिया
गतवर्षी कोरोना विषाणूमुळे बेदाण्याची मागणी कमी झाली होती. त्यामुळे बाजारात मागणी वाढेल असे वाटत नव्हते. त्यामुळे दरही कमी राहतील, असा अंदाज होता. मात्र लोकांनी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बेदाण्याचे सेवन केले आहे. त्यामुळे मागणी वाढली असून, दरात वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत ५० ते ६० रुपयांनी दर वाढले आहेत. यंदा बेदाण्याचे दर चांगले राहतील.
- मनोज मालू, बेदाणा व्यापारी
गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्याने बेदाणा तयार होण्यास वेळ लागत आहे. त्यातही याचा फटका बसल्याने दर्जावर परिणाम झाला आहे. परंतु आता वातावरण चांगले आहे. त्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार होईल.
- मच्छिंद्र माळी, बेदाणा शेड मालक
बेदाणा पुरेसा बाजारात येत नाही. त्यामुळे बेदाण्याला दर चांगले मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दर बरे आहेत. भविष्यात दर कसे राहतील याचा अंदाज आत्ताच सांगता येणार नाही.
- गोरख माळी, उत्पादक शेतकरी, हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ
- 1 of 1580
- ››