कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
अॅग्रो विशेष
बेदाणा निर्यात अनुदान बंदचा उत्पादकांना ९० कोटींचा फटका
गतवर्षी देशातून बेदाण्याची सुमारे ३० हजार टनांची निर्यात झाली होती. मात्र बेदाणा निर्यातीसाठी केंद्र शासनाने प्रोत्साहनपर अनुदान बंद केले आहेत. त्याचा फटका बेदाणा निर्यातीला बसला आहे.
सांगली ः गतवर्षी देशातून बेदाण्याची सुमारे ३० हजार टनांची निर्यात झाली होती. मात्र बेदाणा निर्यातीसाठी केंद्र शासनाने प्रोत्साहनपर अनुदान बंद केले आहेत. त्याचा फटका बेदाणा निर्यातीला बसला आहे. गेल्यावर्षी निर्यातीच्या बेदाण्याला ९० ते १२० रुपये प्रति किलो असणारा दर आता ६० ते ९० रुपये झाला आहे. दरवर्षी सरासरी ३० हजार टनांची निर्यात होते. प्रति किलोस ३० रुपये घसरण गृहित धरल्यास उत्पादकांना सुमारे ९० कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कर्नाटकातील विजापूर, महाराष्ट्रात सोलापूर, नाशिक आणि सांगली जिल्ह्यांत बेदाणा तयार होतो. प्रामुख्याने राज्यात सांगली जिल्ह्यात बेदाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून, सोलापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिक जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात बेदाणा तयार होतो. राज्यात १.८० ते १.९० लाख टन उत्पादन होते. चॉकलेटी आणि काळा बेदाणा प्रामुख्याने निर्यात होतो. त्यापैकी सुमारे ३० हजार टन बेदाणा बेकरी साठी निर्यात होतो. तर २ टक्के हा बेदाणा पशुखाद्यासाठी वापरला जातो. तर पाच टक्के हिरवा बेदाण्याची निर्यात केली जातो.
बेदाणा निर्यात करण्यासाठी निर्यातदारांना प्रति कंटेनर प्रोत्साहन पर १ लाख ते १.२५ लाखाचे अनुदान केंद्र सरकारकडून मिळत होते. त्यामुळे बेदाण्याची निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढे येत होते. दरही चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत होता.
केंद्र सरकारने निर्यातीसाठीचे प्रोत्साहन अनुदान बंद केले आहे. सध्या बेदाण्याची निर्यात सुरू असली, तरी प्रोत्साहन अनुदानाबाबत नवीन धोरण अद्यापही जाहीर केले नाही. अनुदान मिळत नसल्याने बेदाण्याला प्रति किलोस ६० ते ९० रुपये तर हिरव्या बेदाण्याचा दरही कमी झाला आहे. त्यामुळे त्यामुळे यंदा निर्यात घटण्याची चिन्हे आहेत. नवीन बेदाण्याच्या आवकेत वाढ झाल्यानंतर जगातून बेदाण्याची मागणी वाढेल. बेदाण्याची निर्यात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल. मात्र केंद्र शासनाच्या धोरणामुळे ‘खो’ बसण्याची शक्यता आहे.
बेदाणा निर्यातीतील अडचणी
- कंटेनरच्या भाड्यात दुप्पट-तिप्पट वाढ
- केंद्र सरकारकडून बेदाणा निर्यात अनुदान बंद
- नवीन धोरणाबाबत स्पष्टता नाही
- किसान रेलच्या अनुदानात समावेश नाही
बेदाणा दर (रुपये/किलो)
प्रकार | २०२० | २०२१ |
हिरवा | १३० ते १६० | १२० ते १५० |
बेकरीसाठीचा | ९० ते १२० | ६० ते ९० |
कंटेनरचे भाडे (डॉलर/प्रतिकंटेनर)
९०० ते १६००
२०२१
२५० ते ६००
२०२०
प्रतिक्रिया
केंद्र सरकारने बेदाणा निर्यातीसाठी असलेले प्रोत्साहन अनुदान बंद केले आहे. त्याचा फटका निर्यातीला बसेल. त्यामुळे केंद्र सरकारने अनुदान सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्यातच कंटनेरच्या भाड्यात देखील वाढ झाली आहे. यासाऱ्यामुळे बेदाणा दरावर परिणाम होईल, अशी शक्यता आहे. परंतु योजना सुरू झाली तर बेदाण्याची निर्यात वाढून दर चांगले मिळतील अशी आशा आहे.
- विजय पाटील, बेदाणा निर्यातदार, तासगाव
निर्यातीसाठी प्रोत्साहन पर अनुदान झाल्याने दरात घसरण झाली आहे. हा निर्णय बदलला नाही तर दर कमी होतील अशी भीती आहे. त्यामुळे बेदाणा तयार करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. ते भरुन निघणारे नाही.
- सागर आर्वे, शेतकरी, बोरगाव, जि. सांगली.
- 1 of 696
- ››