काश्मीरबाबत जे घडले ते महाराष्ट्रातही घडू शकते : राज ठाकरे

राज ठाकरे
राज ठाकरे

मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम हटवायचे म्हणून इंटरनेट बंद केले गेले, टीव्ही बंद केले गेले, कर्फ्यू लावला गेला. उद्या असेच महाराष्ट्र, मुंबई, विदर्भाबाबतही घडू शकते. बहुमताच्या जोरावर हे सगळे केले जातेय, त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. 

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात शुक्रवारी (ता. ९) राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री. ठाकरे म्हणाले, की रेल्वे भरतीसाठी २००८-०९ ला आंदोलन केले तेव्हा आपल्यावर केसेस टाकल्या गेल्या, पण असेच आंदोलन गुजरातमध्ये झाले तेव्हा गुजरातमधून हाकलून दिलेली उत्तर प्रदेश, बिहारची लोकं महाराष्ट्रात आली आणि हे आंदोलन करणारा अल्पेश ठाकोर भाजपमध्ये प्रवेश करतो आणि आपल्यावर केसेस टाकतात. गुरुवारी नरेंद्र मोदी म्हणाले की, ३७० कलम काढल्यावर काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करू, पण अनेक राज्यांत भाजपची सत्ता आहे, मग तिथे गेल्या पाच वर्षात रोजगार का निर्माण करू नाही शकलात? गेल्या ४५ वर्षांतला बेरोजगारीचा आकडा सध्या सगळ्यात जास्त आहे, असा आरोप श्री. ठाकरे यांनी केला. 

देश आर्थिकदृष्ट्या गर्तेत चालला आहे. पण मोदी भक्तांचे लक्ष नाही, ते सध्या आनंदात आहेत. त्यांच्यावर जेव्हा या आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळेल तेव्हा कळेल.  गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात १४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, जवळपास ६ लाख मध्यम उद्योग बंद पडलेत आणि हे सगळे झाले एका माणसाला आलेल्या नोटाबंदीच्या झटक्यामुळे. जीएसटी आणला, पण केंद्राकडे पुरेसा निधी नाही, त्यामुळे महापालिकांना पैसा नाही, मग शहरे चालणार कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी मध्यंतरी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर सोनिया गांधी यांची भेट घेतली, ममता बॅनर्जींची भेट घेतली, त्यात ईव्हीएम भाजप कशा पद्धतीने वापरत आहे हे या दोन्ही नेत्यांना सांगितले. त्यांनीदेखील हा धोका मान्य केला आणि आम्ही या मुद्द्यावर तुमच्या सोबत आहोत, असे त्यांनी सांगितल्याचे श्री. ठाकरे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com