पाथर्डीत राजळे- ढाकणे परिवाराची प्रतिष्ठा पणाला

पाथर्डीत राजळे- ढाकणे परिवाराची प्रतिष्ठा पणाला
पाथर्डीत राजळे- ढाकणे परिवाराची प्रतिष्ठा पणाला

नगर ः नगर जिल्ह्यामधील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विकासापेक्षा जातीय समीकरणासह अन्य मुद्देच प्रभावी आहेत. त्यामुळे विकासाचे मुद्दे येथे काही अंशी बाजूला पडल्याचे पाहायला मिळत आहेत. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे चिरंजीव प्रताप ढाकणे आणि विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यात लढत होत असून, या वेळी ढाकणे आणि राजळे परिवाराची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. 

मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद जिल्ह्यांना लागून असलेल्या शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघावर दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे कायम वर्चस्व राहिलेले आहे. मुंडे यांच्या प्रभावामुळेच ऊसतोड कामगारांचे नेते दगडू पाटील बडे यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली होती. आताही मंत्री पंकजा मुंडे यांचा या मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे. पंकजा पालवे येथूनच विधानसभेची निवडणूक लढवणार, अशी कित्येक दिवस चर्चा होती. 

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी अनेक वर्षे तसेच आमदार मोनिका राजळे यांचे सासरे अप्पासाहेब राजळे, पती राजीव राजळे यांनीही प्रतिनिधित्व केले. राजीव राजळे यांचा तर उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही गौरव झाला होता. मागील निवडणुकीत उमेदवारी मिळवून अचानक रिंगणात आलेल्या मोनिका राजळे ही मोठ्या मताने निवडून आल्या. आता राजीव राजळे यांच्या निधनानंतर त्यांची पहिलीच निवडणूक आहे. 

या वेळी मात्र राजळे यांना उमेदवारी देण्याला विरोध झाला. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात विकासापेक्षा जातीय समीकरणाचा मुद्दा पुढे आला आणि आता निवडणुकीतही तोच मुद्दा चर्चिला जात असल्याचे दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील निवडणुकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले रिंगणात होते. त्या वेळी त्याचा पराभव झाला. या वेळी घुले यांनी प्रताप ढाकणे यांना उमेदवारी देऊ केली. ढाकणे यांना याआधीही या मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता.

 ‘‘विकासापेक्षा काही लोक जातीयवाद पेरत असल्याचा जाहीर आरोप करताना पाच वर्षांत केलेल्‍या कामावर जिंकणार,’’ असा दावा मोनिका राजळे यांनी केला आहे. मतदानाला चार दिवसांचा अवधी असल्याने जातीय समीकरणे यशस्वी होतात, की राजळे यांनी पाच वर्षांत केलेले काम आणि सहानुभूती कामी येते याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. ढाकणे यांनी या वेळी जिंकायचेच असा चंग बांधला असून, त्या अनुषंगाने आखणी केली आहे. त्यामुळे नेत्यांसह राजकीय जाणकारांचेही पाथर्डी- शेवगाव मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com