राजमाता जिजाऊ जन्मस्थान विकास आराखड्याला निधीची चणचण 

राजमाता जिजाऊसाहेब यांचे जन्मस्थळ असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासासाठी जाहीर केलेल्या आराखड्यातील कामे निधीच्या कचाट्यात सापडली आहेत.
Jijau
Jijau

बुलडाणा ः राजमाता जिजाऊसाहेब यांचे जन्मस्थळ असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासासाठी जाहीर केलेल्या आराखड्यातील कामे निधीच्या कचाट्यात सापडली आहेत. २०१५ मध्ये जाहीर विकास आराखड्यातील कामे निधीअभावी पूर्ण झालेली नाहीत. गेल्या पाच वर्षांत ११२ कोटींच्या विकास आराखड्यातील केवळ दीड कोटीच नियोजन विभागाला मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

दरवर्षी १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी लाखोंची गर्दी होत असते. यंदा कोविड १९ च्या कारणामुळे गर्दी होण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, शासकीय पूजन व इतर कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत होत आहे. सिंदखेडराजा हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील शहर असून ऐतिहासिक किल्ला, वास्तूंचे जतन तसेच या ठिकाणाचा विकास करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ जानेवारी २०१५ ला विकास आराखड्याची घोषणा केली होती. तेव्हा ११२ कोटींचा विकास आराखडा मंजूर अंतिम करण्यात आला होता. या निधीपैकी २५ कोटींच्या पहिल्या टप्प्यातील कामांना शिखर समितीने मान्यताही दिलेली आहे. 

यातील सुमारे १२ कोटी ९३ लाखांची कामे नागपूर येथील पुरातत्त्व विभाग सहायक संचालकांच्या अखत्यारीत मंजूर झाली. यातून राजे लखुजीराजे भोसले यांचा राजवाडा, निलकंठेश्‍वर मंदिर, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट या ठिकाणच्या कामांचा समावेश होता. साडेसात कोटींची कामे तेव्हा सुरु झाली. परंतु या १२ कोटींपैकी केवळ दीड कोटी रुपयांचा निधीच देण्यात आला. त्यामुळे अद्याप पहिल्या टप्प्यातील कामेच पूर्ण झालेली नाहीत. ३ ऑक्टोबर २०१६ रोजी झालेल्या शिखर बैठकीत ११२ कोटी ४६ लाख रुपयांचा सुधारित विकास आराखडा जाहीर झाला होता. यातील २५ कोटी रुपयांचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर पुढील कामे सुरु करण्याचे निर्देश दिलेले आहेत. १२ कोटी ९६ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देत जुलै २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश काढण्यात आलेला आहे. परंतु प्रशासकीय स्तरावर हे सुरु असताना निधी नसल्याने विकास आराखडा कागदोपत्रीच शोभा वाढवीत असल्याची भावना तयार होत आहे. 

शासनाने या ऐतिहासिक वास्तू, शहराच्या विकासासाठी तातडीने निधीची उपलब्धता करून देण्याची मागणी जिजाऊ भक्तांमधून सातत्याने होत आहे.  प्रतिक्रिया नगर पालिका स्तरावरची विकास कामे सुरु आहेत. पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असलेली कामे रखडलेली आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीचा विचार करता निधीची कमतरता भासत आहे. परंतु हा निधी लवकरच देऊन सिंदखेडराजाचा विकास पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिलेले आहे.  - सतीश तायडे, नगराध्यक्ष, सिंदखेडराजा, जि. बुलडाणा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com