एकरकमी ‘एफआरपी’सह २०० रुपये अधिक द्या : शेट्टी

Pay 200 rupee more with a  one time 'FRP': Shetty
Pay 200 rupee more with a one time 'FRP': Shetty

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात उसाला एकरकमी एफआरपीसह अधिक २०० रुपये पहिला हप्ता द्यावा, १५ डिसेंबरपर्यंत साखर कारखान्यांनी निर्णय घ्यावा. तोपर्यंत ऊस तोडणी करण्यास आमची हरकत नाही. मात्र, या मुदतीपर्यंत निर्णय न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे शनिवारी (ता. २३) झाली. या वेळी श्री. शेट्टी म्हणाले, की यंदाच्या गळीत हंगामात अतिवृष्टी, महापूर व अवकाळीमुळे बुडीत झालेल्या उसाची उचल करणे हीच खरी शेतकऱ्यांसमोरील समस्या आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. केवळ दोन ते अडीच महिन्याचा गळीत हंगाम मिळणार आहे.

कायद्याने एकरकमी एफआरपी द्यावी लागणार आहे. परंतु उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे साखर कारखान्यांमध्ये उसाची पळवापळवी आणि दरामध्ये स्पर्धा लागणार आहे. त्यामुळे पहिली उचल म्हणून एकरकमी एफआरपी अधिक त्यावर काही रक्कम द्यावी लागणार आहे. साखर उद्योग अडचणीत आला आहे आहे, पण शेतकरी काय करणार, तोही आर्थिक अडचणीत आहे. यासाठी कारखानदारांनी केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानाची मागणी करून शेतकऱ्यांना चांगला दर दिला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. या वेळी श्री. शेट्टी यांनी ऊस उत्पादकांना येणाऱ्या अडचणीची चर्चा केली.

रविकांत तुपकर म्हणाले, ‘‘सर्वत्र राजकीय स्थिती ढगाळ आहे. काहीच कळायला मार्ग नाही. या परिस्थितीत शेतकऱ्याला सावरण्यासाठी चळवळ टिकली पाहिजे. राज्यकर्त्यांनी घाणेरडे राजकारण केले. शेतकरी प्रचंड संकटात आहे. असे असताना ही राष्ट्रपती राजवट लादली. येथून पुढे स्वाभिमानीच्या युवा फौजा शेतकऱ्यांसाठी लढतील.’’

प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, की जगातील देशांनी इथेनॉल उत्पादन वाढवले आहे. यामुळे साखर जगात कमी पडेल असा अंदाज आहे. यामुळे साखरेचे अर्थकारण करून कमी दर मिळेल हा कारखान्यांचा दावा खोटा आहे. इथल्या साखर उद्योगाने कारखानदारीचा उपयोग राजकारणासाठी केला आणि बिल देता येत नाही, असा कांगावा कारखानदार करीत आहेत. हे चुकीचे आहे. इथेनॉलचे धोरण मारक आहे याचा विपरीत परिणाम या उद्योगावर होत आहे.

 आमदार देवेंद्र भोयर, प्रकाश पोफळे, सावकर मादनाईक, तालुका अध्यक्ष आदिनाथ हेमगिरे, शैलेश चौगुले आदींसह राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.

ऊस परिषदेत शेट्टी यांनी केलेल्या मागण्या

  •     महापुरात बुडालेल्या उसाची कोणतीही कपात न करता प्राधान्याने तोड करावी 
  •     महापूर बाधित शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम त्वरित द्यावी
  •     एफआरपी थकविलेल्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत
  •    थकबाकी असलेल्या कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये
  •     राज्यपालांनी जाहीर केलेली मदत वाढवून द्यावी 
  •     साखरेचा किमान विक्री दर ३५ रुपये करावा
  •     कारखान्यांची थकीत निर्यात सबसिडी वर्ग करावी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com