‘कडकनाथ'प्रकरणी राजू शेट्टींची ‘ईडी’कडे तक्रार

माजी खासदार राजू शेट्टी
माजी खासदार राजू शेट्टी

कोल्हापूर  ः कडकनाथ कोंबडीच्या नावाखाली सुरू केलेल्या महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लि. कंपनीकडून शेतकऱ्यांची मोठी लूट झाली आहे. कंपनीच्या संचालकांची व संबंधितांची त्वरित चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता. ६) ईडीकडे केली.

मुंबई येथे अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) विभागीय विशेष महासंचालक श्री. सुशीलकुमार यांची समक्ष भेट घेऊन कडकनाथ प्रकरणात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. तसेच दोषी व्यक्तींची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे त्वरीत परत देण्यात यावेत, असे निवेदनही या वेळी दिले. याबाबत सुशीलकुमार यांनी सांगितले की, लवकरात लवकर ईडीकडून  सर्व संचालक व संबंधितांच्या संपत्तीला टाच लावून संपत्ती ताब्यात घेणार असून या महिन्यानाअखेरपर्यंत ही कारवाई सुरू करू.

महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनी संपूर्ण महाराष्ट्रात कडकनाथ कोंबडी पाळा व कोट्यधीश व्हा, असे आमिष दाखवून प्रचंड पैसा गोळा केले आहेत. कडकनाथ कोंबडी पाळा, पिले व अंडी आम्ही खरेदी करू, तसेच खाद्य पुरवू असे सांगून १० हजार शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळून सुमारे ५०० कोटी रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करून कंपनीचा मुख्य सुत्रधार फरारी झाला आहे.

राजकीय वरदहस्त असल्यानेच संबंधित सूत्रधार पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित कंपन्यांकडून शेतकऱ्यां‍ना धमक्या दिल्या जात आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर काहींना अटकदेखील झाली आहे. मात्र मुख्य सूत्रधार अद्यापही फरारी आहे. तसेच राजकीय व्यक्तींशी तो संबंधित असल्याने त्याच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागलेला नाही. गोरगरीब शेतकरी यामध्ये अडकले असून त्यामध्ये त्यांच्या कष्टाचे पैसे अडकले आहेत. या सर्व प्रकरणाची तसेच महारयत कंपनीची स्थावर मालमत्ता, संचालकांची सर्व मालमत्ता व त्यांचे बँक खाते त्वरीत सील करण्यात यावेत. ईडीकडून चौकशी झाल्याशिवाय यामधील पाळेमुळे बाहेर येणार नाहीत. संबंधित असलेल्या कंपन्यांचेही चौकशी करावी, अशीही मागणी शेट्टी यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com