विमा कंपन्या लुटत असताना ठाकरे गप्प का बसले: राजू शेट्टी

राजू शेट्टी
राजू शेट्टी

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गेल्या तीन वर्षांपासून विमा कंपन्या लूट करीत असताना उद्धव ठाकरे यांची शिवसेना गप्प का बसली, तुम्हीच ‘पार्टनर’ असलेल्या सरकारमधील अधिकारी या घोटाळ्यात सामील असताना तुम्ही दुर्लक्ष का केले, असे प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहेत.   “कंपन्या आणि अधिकारी एकत्रितपणे पंतप्रधान पीकविमा योजनेत कसा मलिदा लाटत आहे हे आम्ही पुराव्यासहित थेट मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मुख्यमंत्री मूग गिळून बसतात आणि उद्धव ठाकरे सरकारच्या शेवटच्या दिवसांमध्ये विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चे काढण्याची भाषा करतात. ही खेळी शेतकऱ्यांना समजते,” असे श्री. शेट्टी म्हणाले. ‘‘शेतकऱ्यांच्या नावाखाली सुरू केलेली वीमा योजना हा मुळात कंपन्या आणि सरकारी अधिकारी यांच्या माध्यमातून घातला जाणारा दरोडा असतो. कंपन्या शेतकरी आणि शासनाचाच पैसा गोळा करून काही रक्कम वाटतात. उरलेली रक्कम फस्त करतात. त्यासाठी पीक कापणी प्रयोग नावाचा एक बोगस प्रकार घडवून आणला जातो. ज्याच्या नावावर शेत नाही अशा व्यक्तीच्या शेतात पीक कापणी प्रयोग करून त्याच खोट्या आकडेवारीच्या आधारे मात्र इतर शेतकऱ्यांना भरपाई कशी नाकारली जाते याचा पुरावा मी मुख्यमंत्र्यांना दिला आहे,” असे ते म्हणाले. “विमा कंपन्यांच्या दरोड्याविरोधात मी स्वतः देशाच्या विमा नियंत्रण व विकास प्राधिकरणाकडे (इर्डा) तक्रार दाखल केली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कशी लूट केली जाते याविषयी माणिक कदम यांनी दोन वेळा ‘इर्डा’च्या मुख्यालयात जाऊन पुरावे दिले. पुरावे देऊनही सर्व घटक दुर्लक्ष करतात. याचाच अर्थ हा सामूहिक घोटाळा आहे,” असेही श्री. शेट्टी म्हणाले.  दुष्काळात कंपन्यांची दिवाळी राज्यात भीषण दुष्काळ असताना शेतकरी वर्ग विम्याकडे आशेने बघत होता. मात्र लाखो शेतकऱ्यांना कंपन्यांनी विमा नाकारला. त्यातून कोट्यवधी कमावले. एकट्या मराठवाड्यात ऐन दुष्काळात कंपन्यांना एक हजार २६७ कोटी रुपयांचा नफा कमावून दिवाळी साजरी केली आहे. कंपन्यांची दलाली करून आणि शेतकऱ्यांना मरणाच्या दारात ढकलून ज्यांना सत्ता भोगायची त्यांनी ते खुशाल करीत राहावे. तुमच्या पापाला आणि अत्याचाराला आम्ही वाचा फोडत राहू. परवाची पुण्यातील राज्यस्तरीय विमा कार्यशाळा हा केवळ भंपकपणा होता. या वेळी आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आंदोलन योग्यच होते. मुळात मुजोर सरकार बहिरेही झालेले आहे. त्यामुळे कानाखाली आवाज काढावाच लागतो, असेही श्री. शेट्टी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com