महाआघाडीकडे ५० जागांची मागणी ः राजू शेट्टी

माजी खासदार राजू शेट्टी
माजी खासदार राजू शेट्टी

सांगली  ः महाआघाडीकडे आम्हा सर्व लहान १२ पक्षांसाठी एकूण ५० जागांची मागणी केली आहे. त्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, राधानगरी, चंदगड, मिरज, जत आणि खानापूर या जागांचा आग्रह धरला असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

श्री. शेट्टी यांनी सांगली येथे शनिवारी (ता. २८) पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका मांडली. या जागांमध्ये थोडेफार मागे पुढे होऊन आम्ही एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाऊ, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, बहुजन विकास पार्टी, शेकाप, प्रहार यांच्या विविध संघटनांशी आमची चर्चा झाली आहे. आम्ही ५० जागांवर दावा केला आहे. या जागा आम्ही वाटून घेणार आहोत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात मोट बांधली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले आणि चंदगड, तर सांगली जिल्ह्यातील मिरज, जत आणि खानापूर येथील जागांची ‘स्वाभिमानी’साठी मागणी केली आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल. खानापूर मतदारसंघाची जागा आम्हाला दिली तर महेश खराडे यांच्या उमेदवारीची शिफारस आली आहे. प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हंगामी स्वरूपात कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष जालिंदर पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.

मनसे तुमच्या आघाडीत सहभागी होऊ शकते का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, की आमची महाआघाडी झाली आहे. मनसेचा विधानसभा लढण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. ते आमच्यासोबत येणार असतील तर आम्ही नव्याने त्यांच्यासाठी आघाडीत चर्चा करू शकतो. ते आमच्यासोबत यावेत, असे मला वाटते.

सांगोल्यातून निवडणुकीस उभे राहणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, की आमदार गणपतराव देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत चर्चा झाली. सांगोल्यातून निवडणूक लढवावी, अशी विनंती केली. परंतू मी विधानसभेची निवडणूक लढविणार की नाही याबाबत अजून ठरवलेले नाही.

कडकनाथ घोटाळा प्रकरणाचे पुरावे घेऊन ईडीकडे गेलो होते. ते पुरावे सादर केले. परंतू अद्यापही ईडी विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. सत्तेचा गैरवापर करून राजकीय सूडबुद्धीने ‘ईडी’ची कारवाई मागे लावत आहेत. व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार या सरकारचा आहे. ईडी, आयकर विभाग आणि सीबीआय हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे कार्यकर्ते असल्याचे श्री. शेट्टी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com