राम शिंदे यांची विखे पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर

राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे चर्चा करताना
राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे चर्चा करताना

नगर ः विखे पाटील यांना कृषी खाते फार आवडते, पहिल्यांदा ते युतीचे सरकार असताना कृषिमंत्री झाले होते. आता पुन्हा आमचेच (शिवसेना-भाजप) सरकार येणार आहे. त्यामुळे या आमच्याकडे (भाजपमध्ये) कृषी खाते मिळेल, अशी जाहीर ऑफर सोमवारी (ता. ७) पालकमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण यांना जाहीर कार्यक्रमात दिली. त्याला निमित्त ठरले देशी वाणाची बियाणे बॅंक जोपासणाऱ्या राहीबाई पोपेरे यांचे भाषण. या वेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही व्यासपीठावर उपस्थित होते. 

नगरला सोमवारी आदर्श गोपालक, प्रगतिशील शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमानिमित्त विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री राम शिंदे आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात एका व्यासपीठावर होते.

अकोल्याच्या आदिवासी भागात देशी वाणाची जोपासना करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना विशेष पुरस्काराने गौरवल्यानंतर त्यांनी भाषण केले. जुने वाण जोपासा. जुनं ते सोनं असतं, असे आवाहन केले. हा धागा पकडून विखे पाटील यांनी आता लोकांनाही जुनं हवे (सरकार) आहे, असे सांगितले. त्यानंतर पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, की विखे पाटलांनी जुने जोपासलेच पाहिजे, कृषी खाते त्यांच्या आवडीचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा ते युतीच्या सरकारमध्ये कृषिमंत्री झाले. आता पुन्हा आमचेच (शिवसेना-भाजप युतीचे) सरकार येणार आहे. त्यामुळे विखे पाटील जुने जोपासण्यासाठी तुम्ही आमच्याकडे यावे, असे मिश्‍कीलपणे सांगत जाहीर कार्यक्रमात विखे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली.

बाळासाहेब थोरात यांनीही ‘पालकमंत्र्यांनी चुकीचे ऐकले, विखे बोलले ते फार जुने होते,’ असे सांगून टिप्पणी केली. राजकीय भाषणाच्या रंगतीत जरी पालकमंत्री बोलले असले तरी शिंदे यांनी जाहीर ऑफर दिल्याचीच लोकांत चर्चा होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com