राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस: डॉ. रामचंद्र साबळे
राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस: डॉ. रामचंद्र साबळे

राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस: डॉ. रामचंद्र साबळे

मार्च, एप्रिल व मे महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त तापमान व वाऱ्याचा वेग कमी राहिल्याने मॉन्सून राज्यात उशिरा दाखल होईल. मॉन्सून कालावधीत जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत पावसात मोठे खंड पडतील. मात्र सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. - डाॅ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान अभ्यासक

पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून (मॉन्सून) जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान अभ्यासक​ व कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. सरासरीच्या तुलनेत कोकणात ९० टक्के, पश्‍चिम महाराष्ट्रात ९५ टक्के, उत्तर महाराष्ट्रात ९७ टक्के, मराठवाड्यात ९५ टक्के, पूर्व विदर्भात ९८ टक्के, मध्य विदर्भात ९८ टक्के तर पश्चिम विदर्भात ९५ टक्के पाऊस पडण्याचा डॉ. साबळे यांचा अंदाज आहे. डॉ. साबळे यांच्या स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाजाच्या मॉडेलनुसार संबंधित ठिकाणचे गेल्या तीस वर्षांचे हवामान आणि कृषी विद्यापीठांच्या हवामान केंद्रांनी नोंदवलेली यंदाची हवामान घटक स्थिती विचारात घेण्यात आली आहे. सन २०१९ मधील कमाल व किमान तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी आदी घटकांच्या नोंदीवर आधारित हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  डॉ. साबळे म्हणाले, सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज असला तरी काही भागांत, काही कालावधीत जोराचे पाऊस होणे शक्य आहे, महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्यात काही भागांत तेथील सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचे संकेत आहेत. वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै, ऑगस्टमध्ये राहुरी, कोल्हापूर, धुळे, जळगाव, परभणी येथे पावसात मोठे खंड पडतील. तर सोलापूर, पुणे, निफाड, अकोला, सिंदेवाही, दापोली, पाडेगाव व नागपूर भागांत खंडित वृष्टी राहील. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात चांगला परतीचा पाऊस होणे शक्य आहे.     मॉन्सून आगमनास उशीर होणार असल्याने जून महिन्यात पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या वितरणातील फरकाबराेबरच पावसात पडणारे खंड आणि कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस ही या हंगामातील मुख्य वैशिष्ट्य ठरण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील मॉन्सूनची शाखा जास्त सक्रीय होणे संकेत असून, पूर्व विदर्भ, मध्य विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसात वाढ होणे शक्य आहे. तसेच निफाड येथेही पावसात वाढ होण्यास अनुकूल हवामान दर्शवत आहे. मात्र पुणे, राहुरी, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.  हवामान व पावसानुसार करा पीक नियोजन ! पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी. मॉन्सूनच्या आशेवर धूळवाफेची पेरणी करू नये. जमिनीत पुरेसा (६५ मिमी) ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये. या अनुषंगाने १५ जुलैपर्यंत कमी पाण्यावर येणारी व वाढीच्या काळात कमी पाणी लागणारी पिके उदा. मूग, मटकी, उडीद, चवळी, कारळा, बाजरी, सोयाबीन तसेच त्यानंतरच्या पेरणीसाठी सोयाबीन, सूर्यफुलाचा अवलंब करावा. पावसाच्या स्थितीनुसार पीक पद्धतीत बदलण्यासाठी सोयाबीन, मका व तूर ही पिके महत्त्वाची राहतील. बाजरी व तूर अंतरपीक पद्धती अवलंबावी. पाणी साठवणुकीच्या सर्व बाबींवर भर द्यावा. पाच किंवा सहा ओळीनंतर एक सरी पाडून त्यात पावसाचे पाणी मुरेल, यासाठी उतारास आडवी पेरणी करावी. पाणी मुरण्याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. सोयाबीनची रुंद वरंबे आणि सरी पद्धतीने लागवड करणे फायदेशीर राहील. खरीप पिके काढणीच्या वेळी पावसाची शक्यता असल्याने पावसात उघडीप असताना ती काढून त्याची मळणी करणे व माल सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे राहील. त्यामुळे नुकसानीपासून बचाव होईल. कोकणात भात रोपांच्या रोपवाटिका दोन टप्प्यात कराव्यात. त्यामुळे पावसाच्या प्रमाणानुसार भात रोपांची पुनर्लागण करणे शक्य होईल. तसेच लागवडीच्या वेळी योग्य वयाचे रोप उपलब्ध होईल. कोकणातील रायगड, ठाणे व पालघर या भागांत भात पिकात काटेकोर पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे. कपाशी खालील क्षेत्र कमी करण्याचा प्रयत्न करून, त्यात मका, ज्वारी, सोयबीन यांसारख्या कमी कालावधीच्या पिकांचा अंतर्भाव करणे फायदेशीर ठरेल, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली. असा राहील ठिकठिकाणचा पाऊस (जून ते सप्टेंबर २०१९)

ठिकाण    सरासरी (मिमी)  अंदाज (मिमी)  टक्केवारी
अकोला  ६८३  ६५० ९५
नागपूर   ९५८  ९३१  ९७
यवतमाळ ८८२  ८६५ ९८
शिंदेवाही(चंद्रपूर) ११९१ ११७० ९८
परभणी ८१५  ७७५  ९५
दापोली  ३३३९ ३०२०   ९०
निफाड(नाशिक) ४३२ ४२८  ९९
धुळे  ४८१ ४७०  ९७
जळगाव  ६३९   ६१५   ९६
कोल्हापूर  ७०५ ६७५ ९५
कराड (सातारा)  ५७० ५४८ ९६
पाडेगाव (सातारा)  ३६० ३५० ९७
सोलापूर  ५४३ ४८४  ९०
राहुरी ४०६ ३८७   ९५
पुणे   ५६६  ४९४ ९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com