सियावर रामचंद्र की जय ! अयोध्येत रंगला रामजन्म भूमिपूजनाचा सोहळा !!

कडेकोट बंदोबस्तात, वेद मंत्रांच्या उच्चारात, संत-महंतांच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३२ वर्षे जुन्या नऊ शिळांचे पूजन करत रामकाज सुरू केले. जगभरातील कोट्यवधी रामभक्तांनी दूरचित्रवाणीवरून राम मंदिराचा हा भूमिपूजन सोहळा पाहिला.
सियावर रामचंद्र की जय ! अयोध्येत रंगला रामजन्म भूमिपूजनाचा सोहळा !!
सियावर रामचंद्र की जय ! अयोध्येत रंगला रामजन्म भूमिपूजनाचा सोहळा !!

अयोध्या : राम नामाच्या भक्तिसागरात आकंठ बुडालेली ऐतिहासिक अयोध्यानगरी बुधवारी (ता.५) एका नव्या पर्वाची साक्षीदार ठरली. तब्बल ४२९ वर्षांनंतर प्रथमच रामलल्लाचे भवदिव्य मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. कडेकोट बंदोबस्तात, वेद मंत्रांच्या उच्चारात, संत-महंतांच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३२ वर्षे जुन्या नऊ शिळांचे पूजन करत रामकाज सुरू केले. जगभरातील कोट्यवधी रामभक्तांनी दूरचित्रवाणीवरून राम मंदिराचा हा भूमिपूजन सोहळा पाहिला. देशासह सातासमुद्रापार अमेरिकेत देखील असंख्य राम भक्तांनी ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘जय बजरंग बली’च्या घोषणा देत मिठाई वाटत आनंद व्यक्त केला. मंदिराच्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण देखील सर्वार्थाने ऐतिहासिक ठरले. अयोध्येत उभे राहत असलेले रामाचे मंदिर हे सामाजिक एकोप्याचा संदेश देईल असा आशावाद व्यक्त करतानाच मोदींनी राम हे सर्वांचे असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाला मोदींसोबतच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत आणि राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास हे मान्यवर देखील उपस्थित होते. सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्यानगरीमध्ये आगमन झाले. हनुमानगढीवर पूजा केल्यानंतर त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले, असे करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. रामलल्लाला वंदन केल्यानंतर ते मुख्य भूमिपूजन सोहळ्याच्या स्थळाकडे रवाना झाले. या ठिकाणी देखील सरसंघचालकांसह काही मोजकेच लोक उपस्थित होते.  दुपारी अयोध्येमध्ये भूमिपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर सायंकाळी उत्तरप्रदेशसह देशभर दिवाळी साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणांवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मिठाईचे वाटप केले.  मंदिर प्राचीन संस्कृतीचे प्रतीक बनेल : पंतप्रधान मोदी ‘दीर्घ प्रतिक्षा आता संपली आहे. अयोध्येत तयार होणारे मंदिर रामनामाप्रमाणेच भव्यदिव्य असेल. ते भारताच्या प्राचीन संस्कृतीचे प्रतीक असेल. हे राम मंदिर अनंत काळापर्यंत मानवतेला प्रेरणा देईल,’ असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (ता.५) व्यक्त केला. श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात रामंमदिराच्या उभारणीचे महत्त्व सांगितले. ‘जय सियाराम’चा जयघोष करत पंतप्रधान मोदींनी मोजक्या संख्येने निमंत्रित केलेल्या साधु-संत आणि इतर प्रतिष्ठीत नागरिकांशी आणि दूरचित्रवाणीवरून सोहळा पाहणाऱ्या कोट्यवधी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘ हा अत्यंत भावनाप्रधान क्षण आहे. दीर्घ प्रतिक्षा संपली आहे. आज केवळ इतिहास घडत नसून, इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. अनेक खार, वानर अशा अनेक छोट्या घटकांनी जशी प्रभू श्रीरामाला मदत केली, त्याचप्रमाणे सर्वांच्या प्रयत्नांमुळे मंदिर उभारणी होत आहे.'' २००० ठिकाणांवरील माती... २००० ठिकाणांहून आणलेली माती आणि शंभराहून अधिक नद्यांचे पाणी पूजेच्या ठिकाणी ठेवण्यात आले. १९८९ रोजी जगभरातून २ लाख ७५ हजार वीट रामजन्मभूमिसाठी पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९ विटा भूमिपूजनाच्या वेळी मांडण्यात आल्या होत्या. अडवानी, जोशींचा व्हीसीद्वारे सहभाग राम मंदिर आंदोलनाचे प्रमुख नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी हे भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगने सहभागी झाले.  प्रतिक्रिया... राममंदिराचे भूमीपूजन हे भारताच्या सामाजिक सद्भावाच्या भावनेचे उत्तम प्रतीक आहे. — राष्ट्रपती रामनाथ कोविंद

असंख्य ज्ञात-अज्ञात रामभक्तांनी शतकानुशतके केलेला सातत्यपूर्ण त्याग, तपश्‍चर्या व बलिदानाचा हा दृश्‍य परिणाम आहे. — अमित शहा, गृहमंत्री

मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम  सर्वोत्तम मानवीय गुणांचे स्वरुप  आहे. आपल्या मनात असलेल्या मानवतेची मूळ भावना म्हणजे राम आहे. राम प्रेम आहे. घृणामध्ये ते प्रकट होऊ शकत नाहीत. राम करुणा आहेत. ते क्रौर्यामध्ये प्रकट नाही होऊ शकत. राम न्याय आहे, ते अन्यायात प्रकट होऊ शकत नाही. — राहुल गांधी, काँग्रेसचे नेते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com