नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचे डोळे लागले मदतीकडे

नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचे डोळे लागले मदतीकडे
नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचे डोळे लागले मदतीकडे

नागपूर  ः जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुक्‍यातील अतिउष्ण तापमानामुळे वाळलेल्या संत्रा व मोसंबी झाडांचे अनुदान मिळावे, ही मागणी शेतकरी मागील चार महिन्यांपासून करीत आहेत. मात्र, निवडणूक लागल्यावरही काहीच निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. मार्च ते जुलैअखेरपर्यंत उष्णतेचा पारा ४८ अंशावर गेला होता. नरखेड व काटोल तालुक्‍यातील पाण्याची पातळी बाराशे फूट खोलवर गेली. विहीर, बोर, सिंचन, प्रकल्पाने तळ गाठला असतानाच या दोन तालुक्‍यांतील शेतकऱ्यांची संत्रा व मोसंबीची झाडे वाळली. झाडे जगविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हाती काहीच शिल्लक राहिले नाही. पैसा व झाडे दोन्ही गेले. कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालानुसार नरखेड तालुक्‍यात १० हजार १४० हेक्‍टरमध्ये संत्र्याची झाडे आहेत. यापैकी ३ हजार ९३७.५ हेक्‍टरमधील झाडे वाळलेली आहेत. त्यात ६ हजार २०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मोसंबीच्या २ हजार ५३४ हेक्‍टरमधील झाडांपैकी ८४०.२ हेक्‍टरमधील वाळलेली असून, यात ७५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आंबा पिकांची ५ हेक्‍टरमधील झाडांपैकी ३ हेक्‍टरमधील झाडे वाळली असून, पाच शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच, २५ हेक्‍टरमधील लिंबूच्या बागांपैकी दहा हेक्‍टरमधील झाडे वाळली. यात १२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नरखेड तालुक्‍यात १२ हजार ७०४ हेक्‍टरमध्ये फळपिकांची झाडे असून, ४ हजार ७९०.७ हेक्‍टरमधील फळपिकांची झाडे वाळल्याने सहा हजार ७९१ हेक्‍टरमधील बागायतदारांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने काहीच फळपिकांच्या झाडांचे पंचनामे केले आहेत. हजारो झाडे मृतावस्थेत शेतात उभी आहेत, तर काहींनी काढून टाकली आहे. यामुळे त्यांच्या झाडांचा पंचनामा झाला नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. दुसरीकडे महसूल विभाग, पंचायत समिती व कृषी विभागाने सर्वेक्षण करून अहवाल तयार केला असून, त्यानुसार ३७.७ टक्‍के फळपिकांची झाडे या उन्हाळ्यात वाळली आहेत व यात ६ हजार ७९१ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.  

एप्रिल ते मे महिन्यात अतिउष्ण तामानामुळे संत्रा, मोसंबी बागांचे नुकसान झाले होते. त्या बागांचे सर्वेक्षण करून तसा अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. महसूल, कृषी विभागाकडून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. - मिलिंद शेंडे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर

माझ्याकडे विहीर हा एकमेव पाण्याचा स्रोत होता. जाम प्रकल्पाचे पाणीदेखील मिळाले नाही. त्यामुळे अडचणीत वाढ झाली. परिणामी, ७०० झाडे जळाली होती. ही संपूर्ण बागेतील झाडे काढून टाकावी लागली. नव्याने ९०० संत्रारोपांची लागवड केली होती. त्यामुळे ती वाचविण्याकरिता पाण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. ठिबकच्या माध्यमातून कशीबशी ही बाग वाचविली. परंतु, जळालेल्या बागेपोटी शासनाकडून अद्यापही मदत मिळाली नाही. शासनाने ती दिल्यास संत्रा बागायतदारांना दिलासा मिळेल. -  अशोक खराडे, फेटरी, ता. काटोल, जि. नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com