बाजारात रानमेवा खातोय भाव

ranmeva
ranmeva

अकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध प्रकारचा रानमेवा दाखल होत आहे. येथील बाजारात दाखल झालेला हा रानमेवा शहरी ग्राहकांची ‘चविष्ट’ भूक भागवत आहे. लगतच्या खेड्यांमधील शेतकरी हा रानमेवा विक्री करीत असून, बोरूची फुले सर्वाधिक २०० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळवत आहेत. सध्या येथील भाजीबाजारात वैशिष्ट्यपूर्ण अशा रानमेवा विक्रीला आल्याचे बघायला मिळत आहे. नेहमीच्या भाजीपाल्यासोबत हा रानमेवा आहाराची लज्जत वाढवीत आहे. भाजीबाजारात चोखंदळ ग्राहक हा रानमेवा घेताना दिसून येतात. बाजारात नेहमीच्या तुरीच्या शेंगा, आवळे, बोर, पेरू यासोबत अंबाडीची फुले, बोरूची फुले, हादगा अथवा हेट्याची फुले, कुयरीच्या शेंगा, ज्वारीचा हुरडा दिसून येत आहे.  पीकवाढीच्या अवस्थेत येणारी फळे, फुले वा शेंगा यांसारख्या उत्पादनातून आहारात नैसर्गिक चवदारपणा येत आहे. आरोग्यासाठी हा आहारही उत्तम मानला जातो. अंबाडीची फुले ही गोड-आंबट चवीची, तसेच आकर्षक लालचुटूक रंग असल्याने लक्षवेधक ठरत आहेत. ही फुले ४० ते ६० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहेत. कुयरीच्या शेंगांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने या शेंगा कच्च्या आहारात खाल्ल्या जातात, त्यांचा भाव हा ६० ते ८० रुपये किलोदरम्यान आहे.  बोरूची फुले सध्या सर्वाधिक भाव मिळवत आहेत. गुरुवारी (ता. ५) येथील बाजारात बोरूची फुले ६० रुपये पाव म्हणजेच २४० रुपये किलोने विक्री केली जात होती. सरासरी २०० रुपयांपर्यंत दर राहत असल्याचे सांगण्यात आले. हिरव्या आवरणात दडलेली पिवळी धम्म फुले म्हणजे बोरूची फुले असतात. ही फुले चविष्ट असतात. हादगा (हेटा) या झाडाची फुलेसुद्धा ग्राहकांकडून मागणी केली जातात. हादग्याची पांढऱ्या रंगांची फुले बाजारात लगेच लक्ष वेधून घेतात. या फुलांची भाजी अथवा चटणी बनवून आहारात समाविष्ट केली जाते. हादगा ५० ते ६० रुपये किलोने विकत आहे.  तुरीच्या शेंगा बाजारात मुबलक दाखल झाल्या आहेत. ४० ते ६० रुपये प्रतिकिलोने या शेंगा विकल्या जात आहेत. यासोबतच बाजारात आवळा, पेरू, बोर यांची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com