मोहरीला दराचा ‘तडका’ 

राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा टप्पा ओलांडला. राजस्थानमधील मोहरीच्या प्रमुख बाजारपेठा असलेल्या अलवर, बारण, आणि टोंक बाजारात सरासरी दर ५००० ते ५३०० रुपये दर मिळाले.
repeseed
repeseed

पुणे ः राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा टप्पा ओलांडला. राजस्थानमधील मोहरीच्या प्रमुख बाजारपेठा असलेल्या अलवर, बारण, आणि टोंक बाजारात सरासरी दर ५००० ते ५३०० रुपये दर मिळाले. मोहरीला यंदा ४६५० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. आवक वाढत असतानाही मोहरीला यंदा हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. 

राजस्थानमधील बाजारांत मोहरीची आवक वाढत आहे. सोमवारपासून बाजारांतील आवक १००० टनांच्या वर राहिली आहे. सध्या जागतिक पातळीवर खाद्यतेल आणि तेलबियांना चांगला दर मिळतोय. त्यामुळे ऐन आवक वाढल्याच्या काळातही मोहरीला आधार मिळत असल्याचे पाहायला मिळते आहे. यंदा मोहरीच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जातोय. तर सोंगणीचा हंगाम आता सुरू झालाय. असे असले तरी खाद्यतेलातील तेजीमुळे मोहरीचे दर टिकून आहेत. 

‘‘यंदा लागवड क्षेत्र वाढले आहे. तसेच वाढीव उत्पादकतेमुळे मोहरीचे पिकही मोठे राहील,’’ असे सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक भारत मेहता यांनी सांगितले. ‘‘यंदा चांगल्या पावसामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिला. तसेच उत्पादक राज्यांमध्ये हवामानही पोषक होते. त्यामुळे उत्पादन वाढीच्या सरकारी आणि खासगी अंदाजात फरक असला गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के वाढ होणार हे मात्र निश्‍चित आहे,’’ असेही मेहता म्हणाले.  दरात सुधारणा  देशातील मोहरीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या जयपूरमध्येही चांगल्या दर्जाच्या मोहरीला ५८७२ रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. तर इतर बाजार समित्यांमध्ये ५००० ते ५३०० रुपये दर मिळत आहेत. त्यामुळे देशातील मोहरीच्या सर्व बाजारपेठांमध्ये किमान आधारभूत किमतीपेक्षा १००० ते १२०० रुपये जास्त भाव मिळत असल्याचे चित्र आहे.  व्यापाऱ्यांचा उत्पादनात घटीचा अंदाज  केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या उत्पादनाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजांनुसार देशात मोहरीचे १ कोटी ४ लाख ३० हजार टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर व्यापारी सूत्रांच्या अंदाजानुसार देशात ८५ ते ९० लाख टन उत्पादन होऊ शकते. राजस्थान हे मोहरीचे सर्वांत मोठे उत्पादक राज्य आहे. मोहरीच्या मोठ्या उत्पादक राज्यांमध्ये समावेश असलेल्या मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आवकेला सुरुवात झाली आहे. पुढील महिन्याच्या सुरुवातीला मोठी आवक सुरू होईल, तेव्हा किमतीत काही प्रमाणात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  प्रतिक्रिया मोहरीच्या दरांवर सहसा होळीनंतर दबाव येत असतो. यंदा होळीच लांबणीवर पडली आहे. मोहरीच्या तेलाचा एक ठरलेला ग्राहक वर्ग आहे. त्यात एकूणच खाद्यतेलाला चांगला दर मिळत असल्याने दरांना आधार कायम आहे. परंतु पुढील महिन्यात दर काही प्रमाणात दबावात येऊ शकतात.  - भारत मेहता, व्यवस्थापकीय संचालक, सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com