साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ‍ॅक्शन’ 

देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात होण्याकरिता केंद्राने जलदगतीने पावले उचलली आहेत. गेल्या वर्षभरात साखरेच्या निर्यात कोट्यात तिसऱ्यांदा बदल केला आहे.
sugar web
sugar web

कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात होण्याकरिता केंद्राने जलदगतीने पावले उचलली आहेत. गेल्या वर्षभरात साखरेच्या निर्यात कोट्यात तिसऱ्यांदा बदल केला आहे. ज्या साखर कारखान्यांनी साखर निर्यात केलेली आहे, त्या कारखान्यांना पुन्हा कोटे वाढवून दिले आहेत. नव्या बदलानुसार ५ लाख १३ हजार टन साखर देशातील कारखान्यांना विभागून दिली आहे.  महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या वाट्याला १ लाख २४ हजार टन साखरेचा कोटा मिळाला आहे. सर्वाधिक साखरेचा कोटा उत्तर प्रदेशाला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशसाठी २ लाख १८ हजार टन निर्यात उद्दिष्ट देण्यात आले आहे. कारखान्यांनी दिलेला कोटा निर्यात केल्यास हा देशाच्या साखर उद्योगासाठी मैलाचा दगड ठरेल.  गेल्या काही महिन्यांपासून देशात साखर निर्यातीला चालना मिळत आहे. कोविडचा दोन महिन्यांचा कालावधी वगळल्यास सातत्याने निर्यात सुरु आहे. केंद्राच्या निर्यात योजनेचा लाभ घेण्यासाठी देशभरातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. जास्तीत जास्त निर्यात व्हावी यासाठी केंद्राच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने दर तीन महिन्याला आढावा घेण्याचे काम निरंतर सुरु ठेवले आहे.  काही कारखाने निर्यातीकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळल्यानंतर तातडीने या कोट्यात लवचिकता आणली. निर्यात न केलेल्या कारखान्यांचे कोटे काढून घेत ते निर्यात करणाऱ्या कारखान्यांना दिले. यानंतर दोन दिवसांपूर्वीच यात नव्याने बदल करुन पुन्हा ५ लाख १३ हजार टनाच्या कोट्याची विभागणी या पद्धतीने केली. सप्टेंबरला यंदाच्या साखर निर्यात योजनेची मुदत संपणार असल्याने हा कोटा अंतिम ठरणार आहे. साठ लाख टन उद्दिष्टांपैकी ५० लाखांपेक्षा जादा टन साखर जुलैच्या उत्तरार्धापर्यंत निर्यात झाली आहे.  प्रतिक्रिया केंद्रातील अन्न मंत्रालयाकडून सातत्याने फेरआढावा घेतल्यानेच निर्यातीला गती आली. अपेक्षित निर्यात झाल्यास देशातील साखर निर्यातीचा हा उच्चांक ठरेल. निर्यात चांगली झाल्याने पुढील वर्षीही केंद्राकडून साठ लाख टनापर्यंतच्या कोट्यासह हीच योजना सुरु राहण्याची अपेक्षा आहे  -प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ  राज्यनिहाय निर्यात कोटा (टनांत) 

राज्य कोटा 
बिहार ११ हजार २१० 
छत्तीसगड १ हजार ७७ 
गुजरात ३७ हजार २४८ 
हरियाणा ९ हजार ७४६
कर्नाटक ८३ हजार ६४१ 
महाराष्ट्र १ लाख २४ हजार ५३८ 
मध्य प्रदेश १ हजार ५८० 
पंजाब १२ हजार १८० 
तामिळनाडू ६ हजार ५०८
उत्तराखंड ८ हजार ५८२ 
उत्तर प्रदेश २ लाख १८ हजार ५९१

(स्त्रोतः राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com