साखर उद्योगात वेगाने बदल

राज्यातील सहकारी साखर कारखाने सध्या इथेनॉल निर्मितीकडे झपाट्याने झुकत आहेत. मात्र कारखान्यांसाठी इथेनॉल हाच एकमेव पर्याय नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
Rapid changes in the sugar industry
Rapid changes in the sugar industry

पुणे ः राज्यातील सहकारी साखर कारखाने सध्या इथेनॉल निर्मितीकडे झपाट्याने झुकत आहेत. मात्र कारखान्यांसाठी इथेनॉल हाच एकमेव पर्याय नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. धान्यावर आधारित इथेनॉलनिर्मिती आणि इलेक्ट्रिक वाहननिर्मिती, अशा दोन उद्योगांची देशात पायाभरणी सुरू आहे. त्यामुळे भविष्यात साखर कारखान्यांच्या इथेनॉल प्रकल्पांना एकाच वेळी दोन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले, ‘‘व्हीएसआयच्या सर्वसाधारण सभेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलेले मार्गदर्शन साखर उद्योग, साखर कारखाने आणि सहकारी बॅंकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. या तीनही घटकांना भविष्यात तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आस्तित्वाची लढाई देखील अतिशय निकराने लढावी लागणार आहे. ऊस लावा, खरेदी करा, साखर तयार करा, गोदाम ठेवा आणि विकत राहा, अशा साखळीत वर्षानुवर्षे चालू असलेल्या साखर कारखान्यांच्या कामकाजाला आता वेगाने बदलावे लागेल. भविष्यात साखरनिर्मिती कमी होत जाणार असल्याने साखरेवर आधारित सध्याची सर्व व्यवस्था व नियोजनदेखील बदलावे लागणार आहे.’’  बँकांना व्याज कमी द्यावे लागणार इथेनॉलची निर्मिती आता ‘बी’ हेवी मळी, ‘सी’ हेवी मळी, उसाचा रस आणि पाक यापासून करता येते. हे चारही पर्याय आता कारखान्यांना पूर्ण क्षमतेने वापरावे लागतील. दुसऱ्या बाजूला साखरेचे उत्पादन सतत घटते ठेवावे लागेल. त्यामुळे भरपूर साखर तयार करून गोदामात ठेवा आणि बॅंकांचे व्याज भरत बसा असा पारंपरिक पर्याय आता कारखान्यांसाठी खर्चिक ठरेल. इथेनॉल विकताच त्याचे बिल २१ दिवसांत सरकारी तेल विपणन कंपन्या जमा करतात. त्यामुळे साखरेच्या पोत्यावर भरसमाट व्याज देत बसणे आता यापुढे शक्य होणार नाही. सहकारी बॅंकांची काळजी त्यामुळे वाढलेली आहे, असेही नाईकनवरे यांनी सांगितले.  धान्य आधारित इथेनॉल असेल मुख्य स्पर्धक इथेनॉलनिर्मितीचा पर्यायदेखील साखर कारखान्यांसाठी अंतिम ठरणार नाही, असेही चित्र आता पुढे येत आहे. कारण २०२५अखेर केंद्र शासनाला इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (ईबीपी) पूर्ण क्षमतेने राबविण्यासाठी १५०० कोटी लिटर इथेनॉल हवे आहे. साखर कारखान्यांनी काहीही केले तरी तोपर्यंत केवळ ७००-७५० कोटी लिटरचा पुरवठा करण्याची क्षमता कारखान्यांची राहील. त्यामुळे उर्वरित ७०० कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा हा साखर उद्योगातून नव्हे; तर अन्य उद्योगांकडून येईल, असे आता स्पष्ट होत आहे. हा पुरवठा मुख्यत्वे निरुपयोगी धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा राहील. त्यामुळे धान्यावर आधारित इथेनॉल (ग्रेन बेस्ड) निर्मिती प्रकल्प भविष्यात साखर कारखान्यांचे मुख्य स्पर्धक बनण्याची शक्यता आहे.

इथेनॉलला मर्यादित वाव इलेक्ट्रॉनिक्स वाहननिर्मिती उद्योगाची मोठी पायाभरणी देशात होते आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोलसह इथेनॉलच्या वापरावर देखील मर्यादा येतील. कारण इलेक्ट्रॉनिक्स वाहनांची बाजारपेठ येत्या एक दशकात गरुडझेप घेण्याच्या स्थितीत आलेली असेल. या बाजारपेठेचा विस्तार जसाजसा होईल त्या प्रमाणात इथेनॉलचे महत्त्व देखील मर्यादित होत जाईल, असे मत साखर उद्योगातील जाणकारांचे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com