मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट

Rapid decrease in water resources in Marathwada
Rapid decrease in water resources in Marathwada

औरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन झाले. बहुतांश प्रकल्पांची तहान भागली गेली; परंतु त्यानंतरही तब्बल ६३ लघू व मध्यम प्रकल्पांमध्ये पाण्याचा थेंब नाही. पंधरवड्यापूर्वी कोरड्या ६२ प्रकल्पांत आता आणखी एका प्रकल्पाची भर पडली असून, पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. 

मराठवाड्यातील ८७३ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये २४ जानेवारीअखेर ६५.२४ टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. ११ मोठ्या प्रकल्पांत ७६ टक्‍के, ७५ मध्यम प्रकल्पांत ४७ टक्‍के, ७४९ लघुप्रकल्पांत ३९ टक्‍के, गोदावरील नदीवरील १३ बंधाऱ्यात ७८ टक्‍के, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांत केवळ ३० टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे.

मोठ्या ११ प्रकल्पांपैकी मांजरा व सिनाकोळेगाव प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. निम्न दुधना प्रकल्पांत केवळ २४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतील ६४ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ४५ टक्‍क्‍यांच्या आतच आहे. 

मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी या सहा जिल्ह्यांतील लघुप्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ४४ टक्‍क्‍यांच्या आत आहे. केवळ हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील लघुप्रकल्पांतच अनुक्रमे ६४ व ७१ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. कोरड्या ४ मध्यम प्रकल्पांत औरंगाबाद जिल्ह्यातील एक व बीड जिल्ह्यातील ३ प्रकल्पांचा समावेश आहे; तर ९ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद व लातूरमधील प्रत्येकी २, उस्मानाबादमधील ३, जालना व बीडमधील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे. ७५ पैकी १८ प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी उपयुक्‍त पाणीसाठा आहे. 

५९ लघुप्रकल्प कोरडे

७४९ लघुप्रकल्पांपैकी ५९ प्रकल्पांत पाण्याचा थेंब नाही. त्यामध्ये औरंगाबादमधील २१, बीड २२, जालना ४, लातूर ७, तर उस्मानाबादमधील ५ लघुप्रकल्पांचा समावेश आहे. १२० लघुप्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामध्ये उस्मानाबाद व लातूरमधील प्रत्येकी ३७, जालना व बीडमधील प्रत्येकी १८, औरंगाबादधील ६ नांदेडमधील ३ व परभणीतील एका लघुप्रकल्पाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com