केळी दरात सुधारणा

केळी
केळी

जळगाव  ः केळी दरांवरील दबाव मागील दोन दिवसांत काहीसा कमी झाला असून, दरात क्विंटलमागे ७५ रुपयांनी वाढ झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमधून मागणी पुन्हा सुरू झाल्याने आणि कांदेबाग केळीची काढणी जवळपास आटोपल्याने दरात वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे.  या आठवड्यात रावेर बाजार समितीने जाहीर केल्यानुसार अगदी मंगळवारपर्यंत (ता. २२) दर ९२० रुपये प्रतिक्विंटलचे होते. तर जळगाव व चोपडा भागांत कांदेबाग केळीचे दर ८८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. कांदेबाग केळीचे दर चोपडा भागासाठी ९४० रुपये प्रतिक्विंटल तर जळगाव भागासाठी ९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. गुरुवारी (ता. २४) या वाढलेल्या दरात केळीची खरेदी सुरू झाली.  रावेरच्या सीमेनजीकच्या मध्य प्रदेशातील केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या बऱ्हाणपूरच्या बाजारातही केळीची मागील दोन-तीन दिवसांत कमी आवक नोंदविली गेली आहे. ही आवक प्रतिदिन १८० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) एवढी राहिली. बऱ्हाणपुरात मागील पंधरवड्यात केळीची आवक सरासरी २००  ट्रक प्रतिदिन अशी होती. थंडी अधिक असल्यामुळे उत्तरेकडील केळीच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. काश्‍मिरमधील केळी वाहतूक रखडत सुरू होती. तेथे दर आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील फैजपूर व सावदा येथून पाच ते सहा ट्रक केळीची पाठवणूक सुरू होती. सततची बर्फवृष्टी व थंड वातावरणामुळे मागणीही तेथील खरेदीदारांकडून हवी तशी नव्हती. तसेच दिल्ली, पंजाबमध्येही अपेक्षित केळी पुरवठा नव्हता. परंतु जशी थंडी कमी झाली आहे, तशी उत्तरेकडील मागणी सुरू झाल्याने दरांवरील दबाव काहीसा दूर झालेला आहे.  याशिवाय जिल्ह्यात जळगाव, चोपडा भागांत केळीची उपलब्धता घटला आहे. यावल, रावेर, मुक्ताईनगरमधील अर्ली नवती केळी बागांमधून किरकोळ काढणी सुरू आहे. जामनेर व पाचोरा भागांत दुष्काळी स्थितीमुळे केळीला फटका बसला आहे. या सगळ्या स्थितीत केळीच्या दरात वाढ झाल्याचे केळी व्यापाराचे जाणकार सुधाकर चव्हाण (जळगाव) म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com