जळगावात हरभऱ्यासह दादरचे दर टिकून

जळगावात हरभऱ्यासह दादरचे दर टिकून
जळगावात हरभऱ्यासह दादरचे दर टिकून

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्यासह दादरची (ज्वारी) आवक स्थिर आहे. दरही टिकून असून, हरभऱ्यास मागील आठवड्यात प्रतिक्विंटल कमाल ४५०० तर दादरला ३४०० रुपये दर मिळाला. दादरची प्रतिदिन २०० क्विंटल तर हरभऱ्याची प्रतिदिन १५० क्विंटलपर्यंत आवक झाली. 

हरभऱ्याची मळणी अनेक ठिकाणी सुरू आहे. तर आगाप पेरणीच्या क्षेत्रात मळणी पूर्ण झाली आहे. हरभऱ्याचे दर सुरवातीपासून टिकून आहेत. मागील पंधरवड्यातही ४३०० ते ४६०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. काबुली हरभऱ्यास सुमारे ५६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे किमान दर राहिले. आवक जळगावसह यावल, पाचोरा, एरंडोल भागातून होत आहे. पुढे हरभऱ्याची आवक वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

दादरची आवक जळगाव, पाचोरा, यावल, जामनेर भागातून होत आहे. दादरला कमाल ३४०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मागील आठवड्यात मिळाले. तर किमान दर ३१०० रुपयांपर्यंतच आहेत. दर टिकून आहेत. आवक स्थिर असून, पुढेदेखील आवक फारशी वाढणार नाही, असे बाजार समितीमधील सूत्रांचे म्हणणे आहे. कारण दादरचे उत्पादन जिल्ह्यात जळगाव, यावल, पाचोरा, चोपडा, जामनेर भागातच कमी अधिक आहे. 

कोरडवाहू दादरचे पीक अपवादानेच होते. यामुळे ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा होती, तेच शेतकरी पेरणी करू शकले. परिणामी आवक रखडत सुरू आहे. काही खरेदीदार जळगाव, चोपडा व पाचोरा भागात दादरची खेडा खरेदी करीत आहेत. खेडा खरेदीत वाहतूक, वराई आदी खर्च कपात करून दादरचे दर शेतकऱ्यांना दिले जात आहेत. जिल्ह्यात चोपडा व अमळनेर बाजारात दादरची अधिकची आवक होत असून, तेथेही दर ३४०० ते ३५०० रुपयांपर्यंत मिळाले आहेत. अमळनेरात प्रतिदिन ३०० तर चोपडा बाजारात २०० क्विंटलपर्यंत दादरची आवक होत आहे. 

तुरीचे दरही टिकून आहे. जिल्ह्यात रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर व पाचोरा वगळता इतर बाजारांमध्ये तुरीची हवी तशी आवक होत नसल्याचे सांगण्यात आले. जळगाव बाजारात नगण्य आवक मागील आठवड्यात झाली. आवक हवी तशी नसल्याने फक्त शनिवारी तुरीचे लिलाव होत आहेत. तुरीला किमान ४८०० व कमाल ५८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर जळगाव बाजारात मिळाले.

उष्णता, निर्यातीमधील अडथळ्यांमुळे केळी दरांवर दबाव कमाल तापमान खानदेशात ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. जशी उष्णता वाढत आहे, तशी स्थानिक भागातील केळीची मागणी कमी होत आहे. पंजाब, दिल्ली येथील मागणीही हवी तशी नाही. राजस्थान, छत्तीसगड, नागपूर भागांत केळीची क्रेटमधून पाठवणूक होत आहे. केळीला मागील आठवड्यात कमाल ९८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाले. नवती केळीची काढणी रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात सुरू झाली आहे. पाकिस्तान, काश्‍मीर किंवा श्रीनगरमधील केळीची पाठवणूक रोडावली आहे. नवती केळीची प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) आवक झाली. ही आवक पुढे वाढू शकते, असे सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com