देवगड हापूसचा दर कोरोना निर्बंधांनंतरही कायम 

जागतिक दर्जा असलेल्या देवगड हापूस आंब्याचा दर कोरोना निर्बधांनंतरही कायम राहिला असून, सध्या पाच डझन आंब्याची पेटी तीन ते साडेतीन हजार रुपयाला विक्री होत आहे. थेट ग्राहक विक्रीमुळे आंब्याचा दर स्थिर राहिला आहे.
The rate of Devgad hapus remains the same even after corona restrictions
The rate of Devgad hapus remains the same even after corona restrictions

सिंधुदुर्गनगरी ः जागतिक दर्जा असलेल्या देवगड हापूस आंब्याचा दर कोरोना निर्बधांनंतरही कायम राहिला असून, सध्या पाच डझन आंब्याची पेटी तीन ते साडेतीन हजार रुपयाला विक्री होत आहे. थेट ग्राहक विक्रीमुळे आंब्याचा दर स्थिर राहिला आहे. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे या वर्षी आंबा उत्पादन ३० ते ४० टक्केच राहण्याची शक्यता आहे. 

देशविदेशात देवगड हापूसला वेगळे स्थान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका हा हापूस उत्पादनात अग्रेसर आहे. याशिवाय याच तालुक्यालगत आणि किनारपट्टीला असलेले वेंगुर्ला, मालवण हे तालुके देखील देवगड हापूस करीता ओळखले जातात. लांबलेला पाऊस, सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, वादळी वारे, आताच झालेला पूर्वमोसमी पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेले कीड-रोग या अशा अनेक संकटाचा सामना आंबा बागायतदारांना या हंगामात करावा लागला. बदलत्या वातावरणाचा मोठा फटका आंबा उत्पादनावर होण्याची शक्यता असून आंबा उत्पादन ३० ते ४० टक्केच येईल, अशी अपेक्षा बागायतदारांना आहे. 

या वर्षी आंब्याची पहिली पेटी डिसेंबरमध्ये वाशी मार्केटमध्ये पोहोचली. परंतु आंब्याचा नियमित हंगाम फेब्रुवारी महिन्यानंतर सुरू झाला. या कालावधीत काही आंबा उत्पादकांना चार डझनच्या पेटीला चार ते पाच हजार रुपये दर मिळाला. आंब्याची आवक वाढल्यानंतर पाच डझनाच्या पेटीचा दर तीन ते साडेतीन हजारांवर आला. हा दर गेले काही दिवस कायम आहे. सध्या राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आंब्याच्या दर स्थिरतेबाबत आंबा उत्पादकांच्या मनात संभ्रम होता. त्यातच काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे कडक निर्बंध लागू केल्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये चलबिचल झाले. परंतु गेल्या वर्षी कोरोना कालावधीत आलेल्या अनुभवामुळे या वर्षी बागायतदारांनी विक्री व्यवस्थेत तातडीने बदल केले. 

गेल्या वर्षी ‘बागायतदार ते ग्राहक’ अशी थेट विक्री बागायतदारांनी केली होती. त्यामुळे आंब्याच्या पेटीला आंबा हंगाम संपेपर्यंत पंधराशे ते अडीच हजार रुपये दर मिळाला होता. त्यामुळे या वर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच बागायतदारांनी थेट विक्रीवर भर दिला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव यांसह विविध शहरांमधील सोसायट्यांमध्ये थेट विक्री केली जात असल्यामुळे आंब्याच्या दरामध्ये अजिबात घसरण झालेली नाही. सध्या पाच डझनच्या आंबा पेटीला सरासरी तीन ते साडेतीन हजार रुपये दर मिळत आहे. कोरोना निर्बंधानंतरही आंब्याचा दर कायम राहिला आहे. 

कोरोनामुळे गेल्या वर्षी बहुतांशी आंबा उत्पादकांनी थेट ग्राहकाला आंबा विक्री केली. त्यातूनच दलाल साखळी संपुष्टात येऊन आंबा बागायतदाराला चांगला दर मिळाला. आज त्याच पद्धतीने बागायतदार ते थेट ग्राहक ही संकल्पनेनुसार आंबा विक्री करीत आहोत. त्यामुळे वाशी मार्केटमध्ये कमी प्रमाणात आणि थेट विक्रीला अधिकचा आंबा जात आहे. परिणामी, आंब्याचे दर या वर्षी कोरोनाचे निर्बंध असताना देखील कायम आहेत.  - अयोध्या प्रसाद गावकर, आंबा उत्पादक शेतकरी, पुरळ, ता. देवगड 

  • बदलत्या वातावरणामुळे आंबा उत्पादन ३० ते ४० टक्केच अपेक्षित 
  • देवगड हापूस आंबा डझनची विक्री- सातशे ते आठशे रुपये 
  • पाच डझनच्या पेटीची विक्री-तीन ते साडेतीन हजार रुपये 
  • काही ठिकाणी फळाच्या आकारानुसार कमी अधिक दर   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com