दुष्काळात तेरावा ! दूध खरेदीदरात दोन रुपये कपात

दूध खरेदी
दूध खरेदी

पुणे/मुंबई : शासकीय अनुदानाला मुदतवाढ न मिळाल्यामुळे दुधाच्या खरेदीदरात प्रतिलिटर दोन रुपये कपात करण्याचा निर्णय डेअरी उद्योगाने घेतला आहे. आजपासून (ता. १) राज्यातील खासगी व सहकारी संघ शेतकऱ्यांकडून प्रतिलिटर २३ रुपये दराने दूध खरेदी करतील. दरम्यान, ‘एनएनएफ’मधील कपात दर आता फक्त ४० पैसे करण्यात आला आहे.  दुधाचे उत्पादन जादा आणि मागणी कमी झाल्यामुळे गेल्या वर्षी दुधाचे खरेदीदर १८ रुपयांपर्यंत घसरले. त्यातून शेतकऱ्यांनी उग्र आंदोलने केली. अखेर शासनाला अनुदान योजना जाहीर करावी लागली. या योजनेनुसार एक ऑगस्ट २०१८ ते जानेवारी २०१९ अशा सहा महिन्यांसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान होते. मात्र, या अनुदानाची ३० टक्के रक्कम अजूनही वाटली गेली नाही. त्यानंतर पुढील फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांसाठी प्रतिलिटर तीन रुपये अनुदान जाहीर केले गेले. तथापि, दुसऱ्या टप्प्यातील अनुदानदेखील वाटलेले नाही. योजनेचा वाढीव कालावधीसुद्धा मंगळवारी (ता. ३०) संपला आहे. तसेच ही योजना पुढे सुरू ठेवण्याबाबतही राज्य शासनाच्या स्तरावरून कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने नजीकच्या काळात तसा निर्णय होण्याची शक्यता नाही. “अनुदान योजनेला सरकारने मुदतवाढ द्यायला हवी. तसे केल्यास खरेदीदर पुन्हा २६ रुपये होऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूध उद्योगाशी बोलूनच राज्यासाठी चांगली अनुदान योजना जाहीर केली. मात्र, निधी वेळेत वाटले गेले नाहीत. त्यामुळे योजना चांगली असूनही शेतकरी आणि दूध उद्योजकही नाखूश राहिले,” असे श्री. माने यांनी स्पष्ट केले.   महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील म्हणाले, “गाय आणि म्हैस यातील फरक कळत नसलेले सरकार दुधाचे धोरण ठरवित आहे. मुळात सहकारी दूध संघांवर सरकारचा आधीपासून रोष आहेच. त्यांना सहकार टिकवायचा नाही. आर्थिक अडचणीत आलेले सहकारी संघ आता आपआपल्या दराचा पुन्हा आढावा घेणार आहेत. दूध पावडर व बटरचे दर वाढलेले आहेत. मात्र, दुधाचे दर कमी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पशुखाद्याचे भावदेखील वाढल्यामुळे शेतकऱ्याला अजूनही मदतीची गरज आहे.”  दरम्यान, डीग्री (एसएनएफ) कमी बसल्यास शेतकऱ्यांकडून आता सरसकट एक रुपया कापला जाणार नाही. ८.५ एसएनएफच्या खाली प्रतिपॉईंट २० पैसे कपात अपेक्षित असताना शासनाने एक रुपया कपातीला मान्यता दिली होती. ही कपात आता फक्त ४० पैसे राहील. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होऊन दर्जेदार दुधाला २४ रुपयांपर्यंत भाव मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.  आधीच राज्यातील शेतकरी सुल्तानी आणि अस्मानी संकटात आहेत. दुष्काळात पाणी-चाराटंचाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ऐन दुष्काळात आता दुधाच्याही दरात कपात होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. योजना चांगली; पण अधिकाऱ्यांची आडकाठी राज्य सरकारने राबविलेली दूध अनुदान योजना अतिशय उपयुक्त ठरली. त्यामुळेच ८-९ महिने दुधाचे दर कोसळले नाहीत. मात्र, अनुदानवाटपाच्या प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी आडकाठी आणली. पावडर निर्यातीचे ५५ कोटीचे अनुदानदेखील अडवून ठेवले. यामुळे दूध उद्योगाचे तोटे वाढत गेले. परिणामी, ऐन दुष्काळात दूध दर घटविण्याशिवाय इतर पर्याय आमच्याकडे राहिले नाहीत, असा दावा दूध उद्योग सूत्रांनी केला. दूध दरविषयक घडामोडी

  •   शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर दूधाचा खरेदीदर २५ रुपये करून सरकारकडून एक ऑगस्ट २०१८ ते जानेवारी २०१९ या सहा महिन्यांसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहिर
  •   अनुदानाची ३० टक्के रक्कम अजूनही वाटली नाही
  •   फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांसाठी प्रतिलिटर तीन रुपये अनुदान जाहीर
  •   दुसऱ्या टप्प्यातील अनुदान देखील वाटले नाही
  •   दुसऱ्या टप्प्याची मुदत मंगळवारी संपल्याने आजपासून प्रतिलिटर २३ रुपये दराने दूध खरेदी होणार 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com