मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
अॅग्रो विशेष
डाळिंब दरात मोठी सुधारणा
राज्यातील डाळिंब पीक यंदा सततचा पाऊस आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आले आहे. पावसामुळे पिकाचे जवळपास ६० टक्के नुकसान झाल्याने दर्जेदार मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
सांगली ः राज्यातील डाळिंब पीक यंदा सततचा पाऊस आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आले आहे. पावसामुळे पिकाचे जवळपास ६० टक्के नुकसान झाल्याने दर्जेदार मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा झाली आहे. बाजारातील आवक घटल्याने डाळिंबाला प्रति किलो १०० ते २०० रुपये दर मिळत आहे. यंदाच्या वर्षातील हा सर्वाधिक दर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे.
राज्यात डाळिंबाचे क्षेत्र १ लाख ३० हजार हेक्टर असून, त्यापैकी ३२ हजार ५०० ते ३९ हजार हेक्टरवर मगृ बहरातील डाळिंब घेतले जाते. डाळिंब पिकाला जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत सतत पाऊस, बदलत्या वातावरणाचा फटका बसला. त्यातूनही सुमारे पाच ते आठ टक्के बागा वाचल्या. तर डाळिंबाच्या झाडावरील फळांची संख्या कमी झाली. परिणामी, डाळिंबाच्या उत्पादन घट झाली आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डाळिंबाच्या दरात सातत्याने घसरण होत होती. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. गतवर्षी देखील परतीच्या पावसाने डाळिंबावर रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे सुमारे ३० टक्क्यांहून अधिक बागांचे नुकसान झाले होते. मात्र उत्पादनात किंचित घट झाली होती. त्या वेळी बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत डाळिंबाचा पुरवठा अधिक असल्याने डाळिंबाच्या दरात चढ-उतार काही दिवस सुरू होता. गेल्या वर्षी डिसेंबरनंतर डाळिंबाचे दर ४० ते ६० रुपये होते.
डाळिंबाचे तुलनात्मक दर (रुपये/किलो)
१०० ते २००
नोव्हेंबर २०२०
४० ते ६०
नोव्हेंबर २०१९
राज्यातील डाळिंब दृष्टिक्षेपात
डाळिंबाचे क्षेत्र ः १.३० लाख हेक्टर
मृग बहर क्षेत्र ः ३२,५०० ते ३९ हजार हेक्टर
मगृ बहरातील सरासरी उत्पादन ः ४ ते ५ लाख टन
हेक्टरी सरासरी उत्पादकता ः १२ टन
चालू हंगामातील उत्पादन स्थिती
उत्पादन अंदाजे ः १.३२ ते १.९५ लाख टन
हेक्टर सरासरी उत्पादकता ः ५ टन
प्रतिक्रिया
अतिवृष्टीचा मोठा फटका डाळिंबाला बसला. त्यामुळे उत्पादन घटले आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने डाळिंबाच्या दरात वाढ झाली आहे. दिवाळीच्या अगोदर ८० ते १०० रुपये असणारा दर १०० ते २०० रुपये झाला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.
- शहाजी जाचक, माजी अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ
मी २० एकरांवर मृग बहर धरला होता. परंतु अतिवृष्टीमुळे संपूर्ण डाळिंबाचे नुकसान झाले. सध्या डाळिंबाचे दर तेजीत आहेत. पण उत्पादकता घटली असल्याने डाळिंबाला घातलेला खर्च निघेल की नाही याची शाश्वती नाही.
- समानाध भोसले, डाळिंब उत्पादक, पापरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर
अडीच एकर डाळिंब आहे. पण पावसाने आता २ ते ३ टन माल हाती मिळेल. डाळिंब पाहण्यासाठी व्यापारी येत आहेत. पंधरा दिवसांत डाळिंबाची काढणी सुरू होईल. डाळिंबाला १०० ते २०० रुपये असा दर मिळत आहे. यंदा डाळिंबाला चांगला दर आहे.
- बाळासाहेब पांढरे, डाळिंब उत्पादक, करगणी, ता. आटपाडी
- 1 of 657
- ››