सोयाबीन बाजारात तेजीचेच संकेत

शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ८० टक्के सोयाबीन विकले आहे. बाजाराने मागील साडेसहा वर्षांचा विक्रम मोडत २०२० चा शेवट केला.
soybean
soybean

पुणे ः शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ८० टक्के सोयाबीन विकले आहे. बाजाराने मागील साडेसहा वर्षांचा विक्रम मोडत २०२० चा शेवट केला. मिलर्सनी खरेदी वाढविल्याने प्लांटचे दर ४७४० रुपयांपर्यंत पोचले. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि भारतीय सोयाबीन स्वस्त असल्याने निर्यात वाढीची शक्यता असल्याने फेब्रुवारीत सोयाबीन पाच हजारांचा टप्पा गाठेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केली आहे. देशातील मिल्सनी त्यांना गाळपासाठी लागणाऱ्या सोयाबीनचा वाढत्या दरामुळे साठा केला नव्हता. मागील दीड महिन्यात सोयाबीनचे दर ४४०० ते ४५०० रुपायांच्या आसपास होते. त्यामुळे मिल्सनी खेरदी करताना सावध भूमिका घेतली होती. त्या वेळी दर तुटतील आणि आपण ४१०० ते ४२०० रुपयांनी खरेदी करू, अशी त्यांची भूमिका होती. परंतु सोयाबीन दरांनी वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात ४५०० ची पातळी ओलांडली. तसेच आंतरराष्ट्रीय घटक बघता दर आणखी वाढतील असा अंदाज आल्याने मिलर्सनी आता खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे दरात सुधारणा होत आहे. तसेच वायद्यांतील कव्हरिंग करण्यासाठी खरेदी वाढली आहे.  सोयाबीन मार्केट ‘एनसीडीईएक्स’वर वर्षाच्या शेवटी गेल्या साडेसहा वर्षांतील उच्चांकी पातळीवर बंद झाले. मार्च २०१४ नंतरची ही उच्चांकी पातळी होती. गेल्या दोन दिवसांतील प्लांट डिलिव्हरीचे रेट हे ४६०० ते ४७४० रुपये आहेत. त्यामुळे यंदा सोयाबीनच्या दरात जानवेरीतही तेजी राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. खाद्यतेलही १२०० रुपयांवर गेले आहे. फेब्रुवारीत सोयाबीन पाच हजारांचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता, जाणकरांनी व्यक्त केली.  हंगामाच्या सुरुवातीला ‘सीबॉट’वर सोयाबीनचे ९४० वर असणारे दर हे शुक्रवारी (ता. १) १३१० डॉलर बुशेल्स होते. तर सोयामिल ४२९ डॉलरवर पोचले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीन तेजीत आहेत. अर्जेंटिनात दुष्काळ स्थिती असल्याने तेथील सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. ब्राझीलमध्येही उत्पादनात वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. तेथील उत्पादन स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय सोयाबीनला मागणी वाढण्याची शक्यता आहे. 

सोयाबीनची ८० टक्के विक्री सोयाबीनचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी राहिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत दर अधिक असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीला प्राधान्य दिले. मध्यंतरीच्या काळात गुणवत्तेच्या सोयाबीनला ४४५० रुपये दर मिळाल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांनी जवळपास ८० टक्के सोयाबीन विकले. आता केवळ २० टक्के माल शिल्लक आहे. त्यातच निर्यातीला संधी आणि मिलर्सची खरेदी वाढल्याने सोयाबीनचे दर तेजीत आहेत.

यामुळे दर तेजीत

  • केवळ २० टक्के माल शिल्लक
  • साठा करण्यासाठी मिलर्सची खरेदी
  • अर्जेंटिनातील उत्पादन घटीचा अंदाज
  • खाद्यतेल आयातशुल्क कपातीने आंतरराष्ट्रीय दर सुधारल्याचा अनुभव
  • ‘डीओसी’साठी सोयाबीनला मागणी
  • आंतरराष्ट्रीय दराच्या तुलनेत भारतीय सोयाबीन स्वस्त
  • प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयबीनचे दर वाढले, त्याप्रमाणात देशात वाढले नाहीत. त्यामुळे सोयाबीन निर्यातीला संधी आहे. डिसेंबरपर्यंत ८ लाख टन निर्यात झाल्याचा अंदाज आहे. तसेच जानेवारीत ५ लाख टन निर्यात होण्याची शक्यता आहे. ‘डीओसी’ची मागणी आहे. सध्या ३२ ते ३८ हजार टनांनी ‘डिओसी’चे सौदे होत आहेत. खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली तरी त्याचा फारसा परिणाम बाजारवर होणार नाही. - सुरेश मंत्री, शेतीमाल बाजार विश्‍लेषक

    सध्या बाजारात तीन हजार ते सहा हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. सध्या सोयाबीनला ४५०० ते ४६५० रुपेय दर मिळत आहे. पुढील दोन महिन्यांत हे दर पाच हजार रुपयांचा टप्पा गाठतील, असा अंदाज आहे. कारण सोयाबीनची कमतरता आहे आणि मागणी मजबूत आहे.  - राघव झावर, सोयाबीन व्यापारी, निमूच, मध्य प्रदेश

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com