रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनला

लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि ग्लोबल कोकण यांच्या प्रयत्नांतून रत्नागिरी हापूसची २१ डझनाची पहिली पेटी लंडनमध्ये दाखल झाली.
Ratnagiri Hapus reached London
Ratnagiri Hapus reached London

रत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि ग्लोबल कोकण यांच्या प्रयत्नांतून रत्नागिरी हापूसची २१ डझनाची पहिली पेटी लंडनमध्ये दाखल झाली. हापूस निर्यातीचा पहिला मान राजापूर तालुक्याला मिळाला. मुहूर्ताच्या पहिल्या डझनला ५१ पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार त्याला ५ हजार रुपये विक्रमी दर मिळाला.

यंदाचा आंबा हंगाम प्रतिकूल असला तरीही रत्नागिरी हापूसची जास्तीत जास्त निर्यात व्हावी यासाठी संजय यादवराव यांच्या ग्लोबल कोकण संस्थेने पावले उचलली आहेत. या संस्थेच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील तीन बागायतदारांकडील आंबा मुंबईतील निर्यातदाराकडे पाठविण्यात आला. वाशी येथील पणन मंडळाच्या पॅक हाऊसमध्ये त्यावर प्रक्रिया केली गेली. तेथून हवाई मार्गे २१ डझन हापूस लंडनकडे गेला.

लंडनमधील भोसले एंटरप्रायझेसचे तेजस भोसले यांच्याकडे २१ फेब्रुवारीला बॉक्स पोचले. तेजस गेली अनेक वर्षे हापूसची लंडनमध्ये विक्री करत आहेत. गतवर्षी कोरोनाच्या परिस्थितीतही हापूसची चव लंडनवासीयांना चाखता आली. यंदा आंब्यासाठी प्रतिकूल परिस्थिती आहे. तरीही बागायतदार योग्य व्यवस्थापन करून आंबा बाजारात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

या संदर्भात लंडनस्थित व्यावसायिक तेजस भोसले म्हणाले की, यंदा प्रथमच फेब्रुवारी महिन्यात हापूस दाखल झाला. पहिल्या एक डझनच्या पेटीला ५१ पौंड तर अन्य २० डझनला प्रत्येकी ३० पौंड दर मिळाला आहे. पौंडला भारतीय चलनानुसार सध्या १०१ रुपये मिळतात. भविष्यात जास्तीत जास्त आंबा मार्केटमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वांत लवकर आंबा आल्यामुळे विक्रमी दर मिळाला. यापूर्वी जास्तीत जास्त १८ ते २० पौंड डझनला मिळत होते.

संजय यादवराव म्हणाले, की हापूसला युरोपमधील बाजारपेठ मिळवून देतानाच चांगला दरही आम्ही मिळवून देणार आहोत. यंदा हापूस निर्यातीचा पहिला मान राजापूर तालुक्याला मिळाला आहे. तीन बागायतदारांकडील आंबा घेऊन तो मुंबईतील निर्यातदाराच्या मार्फत लंडनला गेला. १५ मार्चनंतर आणखी हापूस तिकडे पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रथम प्रक्रियेसाठी वाशीतील पणन निर्यात केंद्राचा वापर केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com