रत्नागिरीला जागेवर खरेदीसह होणार रोख व्यवहार

रत्नागिरीलाजागेवर खरेदी आणि रोखीतील व्यवहार या बोलीवर आंबा देण्यास स्थानिक बागायतदारांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे येत्या १० मार्चपासून रत्नागिरीत इनोटेरा कंपनीची आंबा खरेदी सुरू होणार आहे. ​
Ratnagiri will have cash transactions with on-site purchases
Ratnagiri will have cash transactions with on-site purchases

रत्नागिरी ः वाशी, अहमदाबादसह महत्त्वाच्या बाजारपेठांमधील दरानुसार रत्नागिरीतील केंद्रांवर स्थानिक बागायतदारांकडून हापूस आंबा खरेदी करण्याबाबत इनोटेरा कंपनी आणि स्थानिक बागायतदारांशी सकारात्मक चर्चा झाली. जागेवर खरेदी आणि रोखीतील व्यवहार या बोलीवर आंबा देण्यास स्थानिक बागायतदारांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे येत्या १० मार्चपासून रत्नागिरीत इनोटेरा कंपनीची आंबा खरेदी सुरू होणार आहे.  रविवारी (ता.२७) झालेल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध देशांमधील निर्यातीबरोबरच हापूस आंब्याची चव देशाच्या कानाकोपऱ्या‍यात पोचवण्यासाठी इनोटेरा कंपनीकडून यंदाच्या हंगामात पावले उचलण्यात आली आहे. स्थानिक बागायतदारांबरोबर गेले काही दिवस सकारात्मक चर्चा झाली होती. रविवारी एका खासगी हॉटेलमध्ये इनोटेराचे प्रतिनिधी दीपक बन्सल यांच्यासह बागायतदारांबरोबर चर्चा झाली. या वेळी तुकाराम घवाळी, राजेंद्र कदम, राजू पावसकर यांच्यासह अनेक बागायतदार उपस्थित होते.  कोकणातील शेतकऱ्‍यांनी एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करावी आणि त्याद्वारे इनोटेराला आवश्यक आंबा विक्री करावा, अशी सूचना करण्यात आली होती; मात्र हंगामाच्या तोंडावर तांत्रिकदृष्ट्या संस्था स्थापन करणे शक्य नाही. त्यामुळे हंगामाच्या आरंभी कंपनीच्या केंद्रांवर बागायतदारांकडून थेट आंबा खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये १५० ग्रॅमपासून ३२५ ग्रॅम वजनापर्यंतचा आंबा ग्रेडेशननुसार खरेदी केला जाईल. डझनचे दर ठरवताना मुंबईतील वाशी किंवा अन्य बाजारपेठेतील चालू दरानुसार खरेदी करण्यास कंपनीकडून तयारी दर्शविण्यात आल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले.  आंबा खरेदीसाठी रत्नागिरी तालुक्यात तीन, तर अन्य ठिकाणी सहा केंद्रे सुरू केली जाणार आहेत. ही खरेदी १० मार्चपासून केली जाणार असून दराबाबत एक दिवस आधी सूचना देण्यात येणार असल्याचे बैठकीमध्ये ठरवण्यात आले आहे. जास्त माल असेल तर तो संबंधित शेतकऱ्या‍च्या बागेमध्ये जाऊन आणण्याची तयारीही या वेळी दर्शवली आहे; मात्र कमी पेट्या असल्या तर बागायतदाराला केंद्रापर्यंत तो आणून द्यावा लागणार आहे. या प्रसंगी बागायतदारांनी आंबा देण्यास तयारी दर्शविली आहे. तसेच दर्जाप्रमाणे दर ठरवा आणि जागेवर पैसे द्या, अशी सूचना केली आहे. त्यानुसार कंपनी विचार करून निर्णय घेणार आहे.  या प्रसंगी बागायतदार राजेंद्र कदम यांनी डागी आंब्याच्या खरेदीविषयी विचारले असता कंपनीकडून किलोने डागी आंबा खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. 

आंबा बागायतदारांची संस्था तयार करण्याचे काम चालू असून मॅगोनेट, जीआय मानांकन असेल तर उपयुक्त ठरले. या व्यतिरिक्त सर्व प्रकारचा आंबा कंपनी घेणार आहे.  - दीपक बन्सल, प्रतिनिधी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com