तुपकरांसह आमदार भुयार शेतकऱ्यांच्या बांधावर

रविकांत तुपकरांसह आमदार भुयार शेतकऱ्यांच्या बांधावर
रविकांत तुपकरांसह आमदार भुयार शेतकऱ्यांच्या बांधावर

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व आमदार देवेंद्र भुयार यांनी मंगळवारी (ता. ५) शेतकऱ्यांच्या बांधावर पोचून नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सभागृहात मागणी रेटून धरण्यासह रस्त्यावर उतरून लढा देऊ, अशी ग्वाही देत शेतकऱ्यांनी या संकटकाळी खचून न जाता धैर्याने सामना करावा, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना धीरदेखील दिला. सरसकट नुकसानभरपाई मिळावी, यासाठी रस्त्यावरची लढाईदेखील करावी लागणार आहे, त्यासाठी तयार राहा असे आवाहनदेखील त्यांनी केले. रविकांत तुपकर व आमदार देवेंद्र भुयार यांनी सोमवारी (ता. ४) मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन केल्यानंतर मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पोचून नुकसानीची पाहणी केली. मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख, गणपूर व लोणार तालुक्यांतील अंजणी खुर्द, शिवणी पिसा, चिखली तालुक्यातील पेठ, मेरा बुद्रुक व बुलडाणा तालुक्यातील सावळा, भादोला, वाडी, वरवंड, डोंगर खंडाळा आदी गावांचा दौरा करत शेतकऱ्यांना धीर दिला. गत १५ दिवसांपासून मॉन्सूनोत्तर पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले आहेत. त्यातच ३१ ऑक्टोबर, तसेच १ व २ नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीने सर्वच नदी, नाल्यांना महापूर आला. काही ठिकाणी शेतातील उभी पिके वाहून गेली, तर काही ठिकाण सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या. अनेक जनावरे वाहून गेली, जमिनी खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण खरीप हंगामच पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांना तातडीने भरघोस मदत देण्याची गरज आहे. शासनाने कोणतीच अट न लादता सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावी, अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी येत्या सोमवारी (ता. ११)  चक्का जाम आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा, असे आवाहनदेखील या दौऱ्यात रविकांत तुपकर व आमदार देवेंद्र भुयार यांनी केले. या वेळी  ''स्वाभिमानी''चे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com