तुपकरांच्या राजीनाम्यामुळे ‘स्वाभिमानी’पुढे पुनर्बांधणीचे आव्हान

रविकांत तुपकर
रविकांत तुपकर

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पराभवापासून मरगळ अनुभवत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या सोडचिठ्ठीने मोठा हादरा बसला आहे. ‘स्वाभिमानी’च्या या आक्रमक नेतृत्वाने संघटनेच्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत संघटनेत खळबळ उडवून दिली. खासदार राजू शेट्टी यांच्या पराभवानंतर एकाकी पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेल्या सहा महिन्यांत हा दुसरा मोठा धक्का बसला. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याच्या अस्तित्वावरच आता प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे, तसेच संघटनेच्या पुनर्बांधणीचे आव्हानदेखील निर्माण झाले आहे.

उल्हास पाटील, सदाभाऊ खोत संघटनेपासून दूर झाल्यानंतर श्री. तुपकर यांनी श्री. शेट्टी यांना मोठा आधार देऊन राज्यभर संघटनेचे विचार प्रस्थापित करण्यात मदत केली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीत बुलडाण्यातून उमेदवारी न मिळाल्याने श्री. तुपकर नाराज होते. त्यांनी नाराजी प्रत्यक्षात बोलून दाखविली नसली तरी, अलीकडच्या संघटनेच्या उपक्रमांत त्यांचा फारसा सहभाग नव्हता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटनेच्या वतीने त्यांना उमेदवारी मिळेल असे चित्र होते.

परंतु ‘स्वाभिमानी’ने त्यांच्या उमेदवारीबाबत फारशी स्पष्टता दाखविली नाही. यामुळे नाराज असलेल्या तुपकरांनी संघटना सोडण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीक पाहाता, ते भाजपत प्रवेश करतील अशी शक्‍यता आहे. श्री. तुपकर यांच्या राजीनाम्याने मात्र संघटनेने सदाभाऊ खोत यांच्यानंतर दुसरी मुलुख मैदानी तोफ गमावली आहे.

माजी खासदार शेट्टी यांच्याशिवाय मोठा प्रभाव असणारा राज्यव्यापी नेता नसल्याने आता संघटनेच्या वाटचालीबाबतच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. शेट्टी वगळता संघटनेत जोरदार काम करेल, असा राज्यव्यापी वलय असलेला नेता सध्या संघटनेत उरला नाही. यामुळे ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. जशी सदाभाऊ खोत यांच्यावर संघटनेकडून टीकेची झोड उठली, तितकी टीका तुपकर यांच्यावर झाली नसली तरी संघटनेचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आता फक्त श्री. शेट्टी यांच्यावरच अवलंबून आहे.

बहुजनांवर संघटना अन्याय करते, हा प्रचार गेल्या काही दिवसांपासून प्रबळ होत गेला. याच विचारातून संघटनेत असणाऱ्या बहुजन समाजाच्या नेत्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. सदाभाऊ खोत यांना संघटनेतून काढल्यानंतर श्री. तुपकर यांच्या रूपाने बहुजनांचा आश्‍वासक चेहरा म्हणून संघटनेने त्यांना सामोरे आणले होते. परंतु त्यांच्याच जाण्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे नव्याने आव्हान निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचा अभाव आढळून येत आहे.

खासदारकी गेल्यानंतर श्री. शेट्टी यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकत समविचारी पक्षांशी आघाडीचे प्रयत्न सुरू केले. या घडामोडी सुरू असतानाच अचानक श्री. तुपकर यांनी संघटनेशी फारकत घेतली. तुपकर यांनी संघटनेतून बाहेर पडण्याचे नेमके कारण स्पष्ट केले नसले तरी, खासदारकीच्या उमेदवारीवेळी आलेली निराशा आणि अन्यायाची भावना यामुळेच ते बाहेर पडल्याची चर्चा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com