पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने महागला

पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा वायदेबाजार, साठेबाजी आणि सट्टा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. परिणामी पशुखाद्याच्या कच्च्या मालाच्या दरात गेल्या महिन्याच्या तुलनेत आता दुप्पट दर झाले आहेत.
Raw materials for animal feed production have doubled in price
Raw materials for animal feed production have doubled in price

सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या सोयाबीन, भुईमूग, सरकी यासह अन्य कच्च्या मालाचा वायदेबाजार, साठेबाजी आणि सट्टा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. परिणामी पशुखाद्याच्या कच्च्या मालाच्या दरात गेल्या महिन्याच्या तुलनेत आता दुप्पट दर झाले आहेत. पोत्यामागे ६० ते १०० रुपयांपर्यंत दरात वाढ झाली असून दुधाला मिळणारा कमी दर यामुळे दूध व्यवसाय अडचणीत असून पशुपालक हवालदिल झाले आहेत.

बिहार, कर्नाटक, मध्यप्रदेश, आणि उत्तरप्रदेश या राज्यातून पशुखाद्य बनविण्यासाठी कच्चा माल येतो. त्यावर प्रक्रिया करून खाद्य तयार केले जाते. तीन वर्षांपूर्वी महापुराने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे खाद्याच्या दरात वाढ झाली. त्यानंतर पशुखाद्याचे दर स्थिर होते. गेल्यावर्षीदेखील खाद्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरेसा उपलब्ध होता. दरही कमी होते. त्यामुळे दर टिकून होते. वास्तविक पाहता गेल्या वर्षभरात पशूखाद्याच्या दरात दोनवेळा वाढ झाली होती.

नोव्हेंबर २०२० मध्ये भुईमूग, सोयाबीन, मका या पिकांचे पावसाने नुकसान झाले होते. त्यामुळे त्यावेळी २० टक्क्यांनी वाढ झाली होती. पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने पशुपालकांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपायला तयार नसल्याचे चित्र आहे. त्यातूनही पशुपालकांनी जनावरांचा सांभाळ करून दुग्ध व्यवसाय चिकाटीने सुरू ठेवला आहे.

दरम्यान, डिसेंबर जानेवारी महिन्यात पशुखाद्य दर स्थिर होते. परंतु फेब्रुवारी महिन्यात पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या शेतीमालाची साठेबाजी होऊ लागली. वायदे बाजारामुळे दरात वाढ झाली आहे. त्यातच सट्टेबाजी सुरू झाली. यासारख्या कच्चा मालाची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे तब्बल एक ते दोन महिन्यात कच्च्या मालाच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे खाद्यांच्या दरात पोत्यामागे म्हणजे किलोस अडीच रुपयांपासून ते आठ रुपयांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ सध्या दिसून येत नाही. सध्या एका दुधाळ जनावरासाठी १८० रुपये खाद्यासाठी खर्च करावा लागत आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी सरकी पेंड ४० किलोचे पोते ११०० रुपये असा दर होता. सध्या या पेंडीचा दर १३५० रुपये असा आहे. अर्थात दोन महिन्यांत २५० रुपयांनी दरात वाढ झाली. परंतु पुढील महिन्यात तयार झालेल्या खाद्याच्या दरात वाढ झालेली दिसून येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने दुग्ध व्यवसायावर संक्रांत आली आहे. दहा दिवसांच्या मिळणाऱ्या बिलातून आता पशुखाद्यावरच खर्च होत असून व्यवस्थापन आणि भांडवली खर्च अंगावर पडत असून अशीच परिस्थिती राहिल्यास जनावरे सांभाळायची कशी असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.

खाद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे खर्चात वाढ होत असून  दुधाचे दर कमी आहेत. त्यामुळे आर्थिक ताळमेळ घालणे कठीण बनत आहेत. खाद्याच्या दरात होणारी वाढ आणि दुधाला मिळणारा कमी दर यामुळे भविष्यात जनावरे सांभाळायची की नाही असा प्रश्न पडला आहे. - रविकांत शिंदे, कांचनपूर, ता. मिरज, जि. सांगली

दरवाढीने वाढल्या अडचणी

  • पशूखाद्य दरवाढीमुळे पशुपालकांच्या मागे शुक्लकाष्ट
  • पशूखाद्याच्या पोत्यामागे ६० ते १०० रुपयांपर्यंत दरवाढ
  • सोयाबीन, भुईमूग, सरकीची साठेबाजी
  • पावसाने भुईमूग, सोयाबीन, मका पीक नुकसानीचा परिणाम
  • पशुखाद्य दर (टनात)
    कच्चा माल फेब्रुवारी २०२१ एप्रिल २०२१
    शेंग डीओसी २२००० ४२०००
    सरकी डीओसी २२००० ३९०००
    मोहरी पेंड १८००० ३२०००
    मका १६००० १८५००
    सोयाबीन डीओसी ३५००० ६५०००
    डीओईल राईस पॅन ११८०० १३८००
    राईस पॉलीश १६९५० १८५००
    बायपास फॅट ६३ प्रति किलो ११० प्रति किलो

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com